नाशिक महापालिका देणार सहा दिवसांत दहा हजार कोरोना लस! 

नाशिक : जानेवारीअखेर कोरोना लस उपलब्ध होणार असल्याने त्यादृष्टीने महापालिकेने तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाणार असून, हे लक्ष्य सहा दिवसांत पूर्ण केले जाणार आहे. त्यासाठी १५ पथके व साठ कर्मचारी राहणार आहेत. 

पहिल्या टप्प्यात कोरोनाविरोधात लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस
केंद्र सरकारने १६ जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात कोरोनाविरोधात लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. शहरात खासगी व सरकारी रुग्णालयांत दहा हजार आरोग्य कर्मचारी आहेत. सहा दिवसांत दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने पंधरा पथकांची निर्मिती केली असून, त्यात एक डॉक्टर, एक परिचारिका, एक डाटा एंट्री ऑॅपरेटर व एक शिपाई असे प्रत्येकी चार कर्मचारी राहणार आहेत. एक पथक दिवसाला शंभर लसीकरण करेल. पंधरा पथके असल्याने रोज दीड हजार लसीकरणाचे उद्दिष्ट राहणार आहे. महापालिकेला लस प्राप्त झाल्यानंतर राजीव गांधी भवनमधील शीतपेटीत ठेवले जाणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेट्ये यांनी दिली. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

या सहा केंद्रांत होणार लसीकरण 
- नवीन बिटको रुग्णालय 
- नाशिक रोड येथील जुने बिटको रुग्णालय 
- पंचवटी विभागातील इंदिरा गांधी रुग्णालय 
- सिडकोतील मोरवाडी रुग्णालय 
- कथडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय 
- सातपूर पालिका प्रसूती केंद्र  

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा