नाशिक महापालिका निवडणूक : 35 ओबीसी, 34 सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित

नाशिक मनपा आरक्षण 2

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.29) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) तसेच सर्वसाधारण जागेतून महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यानुसार 104 जागांपैकी ओबीसींकरिता 35 आणि सर्वसाधारण गटातून 34 महिला आरक्षणाच्या जागा निश्चित करण्यात आल्या असून, महिला आरक्षणामुळे मनपातील अनेक माजी दिग्गजांच्या दांड्या उडाल्या, तर अनेक जण ‘सेफ झोन’मध्ये राहिल्याने त्यांच्या निवडणुकीची वाट सोपी झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल मान्य करीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण मंजूर केले. त्यामुळे ओबीसींचा आणि एकूणच महापालिकेच्या निवडणुकीचाही मार्ग मोकळा झाला. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणासह सर्वसाधारण गटातील महिला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या अनुषंगाने शुक्रवारी (दि. 29) नाशिक महापालिका निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम महाकवी कालिदास कलामंदिरात पार पडला. यावेळी मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच प्रशासन तथा निवडणूक विभागाचे उपआयुक्त मनोज घोडे-पाटील उपस्थित होते.

महापालिकेच्या 44 प्रभागांच्या एकूण 133 जागा आहेत. त्यापैकी 19 जागा अनुसूचित जाती, तर 10 जागा या अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता याआधीच राखीव झालेल्या आहेत. त्यामुळे 133 पैकी राहिलेल्या 104 जागांतून 35 जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी), तर 34 जागा सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला आणि त्यानंतर सर्वसाधारण गटाचे महिला आरक्षण निश्चित करण्यात आले.

ओबीसी प्रवर्गाच्या 35 जागांपैकी 21 जागांवर थेट आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यात 5 अ, 6 अ, 8 अ, 9 अ, 10 अ, 13 अ, 16 अ, 17 अ, 18 अ, 19 अ, 21 अ, 29 अ, 30 अ, 31 अ, 32 अ, 33 अ, 36 अ, 37 अ, 38 अ आणि 40 अ या जागांचा समावेश होतो. ओबीसींच्या उर्वरित 14 जागांसाठी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत चक्राकार पद्धतीने सोडत काढण्यात आली. या जागांवरील ओबीसी आरक्षण निश्चित करण्यासाठी दोन जागा अराखीव असलेल्या 19 प्रभागांची निवड करण्यात आली. या 19 प्रभागांच्या चिठ्ठ्यांतून 14 प्रभागांच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यात 4 ब, 39 ब, 24 ब, 25 ब, 23 ब, 42 ब, 15 ब, 22 ब, 41 ब, 20 ब, 35 ब, 14 ब, 43 ब, 26 ब या जागांवर सोडतीद्वारे ओबीसी आरक्षण पडले. यानंतर ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या 35 जागांपैकी 18 जागांवर ओबीसी महिला आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव मात्र महिला आरक्षण नसलेल्या 15 ब, 20 ब, 23 ब, 24 ब, 25 ब, 39 ब, 42 ब या सात प्रभागांत आठ ओबीसी प्रवर्ग महिलांसाठी थेट आरक्षण निश्चित करण्यात आले.

तसेच पंचवटी विभागात प्रभाग क्र. 8 हा चारसदस्यीय असल्याने यातील एका जागेवर म्हणजेच 8 अ या जागेवरदेखील ओबीसी महिला आरक्षण थेट निवडण्यात आले. यानंतर सोडतीद्वारे उर्वरित 10 ओबीसी महिलांचे आरक्षण 19 प्रभागातून निवडण्यात आले. त्यापैकी 9 अ, 33 अ, 30 अ, 10 अ, 18 अ, 19 अ, 29 अ, 38 अ, 32 अ आणि 21 अ या 10 जागांवर महिला आरक्षण निश्चित झाले आहे.

एकूण सदस्य संख्या व आरक्षण
एकूण सदस्य संख्या – 133
अनुसूचित जातीसाठी राखीव 19 पैकी 10 महिला आरक्षित
अनुसूचित जमातीसाठी 10 पैकी पाच जागा महिला राखीव
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरिता 35 पैकी 19 महिला राखीव
सर्वसाधारण (खुला वर्ग) 96 जागांपैकी 34 जागा महिला राखीव

प्रवर्ग                               एकूण जागांची                                    महिलांकरिता
संख्या                                          आरक्षित जागा
अनुसूचित जाती                  19                                                    10
अनुसूचित जमाती               10                                                    05
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 35                                                   18
सर्वसाधारण                        69                                                   34

एकूण                                133                                                 67

The post नाशिक महापालिका निवडणूक : 35 ओबीसी, 34 सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित appeared first on पुढारी.