नाशिक महापालिका मुख्यालयात २८ कर्मचाऱ्यांचा कोरोनाची लागण; प्रशासकीय यंत्रणा सतर्क

नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय आणि त्यातच नाशिक शहर हे कोरोनाचा हॉटस्पॉट बनलं आहे. चिंताजनक बाब म्हणजे, देशातील सर्वाधिक 10 कोरोनाग्रस्त शहरांच्या यादीत नाशिक जाऊन पोहोचले आहे. शासनाने कोरोनाबाबत घालून दिलेल्या नियमांचे नागरिक पालन करत नसल्याने नाशिकमध्ये विकेंड लॉकडाऊनची घोषणाही करण्यात आली आहे. अशातच आता महापालिका मुख्यालयात २८ कर्मचाऱ्यांचा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यावेळी प्रशासकीय यंत्रणा खडबडून झाली आहे.

चौथ्या दिवशी दोन हजारांहून अधिक कोरोनाबाधित
जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी दोन हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळून आले. शनिवारी (ता. २०) दिवसभरात दोन हजार ३८३ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले, तर आठ ज्येष्ठ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. दरम्‍यान, दिवसभरात ८४८ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत एक हजार ५२७ ने वाढ झाली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात उपचार घेत असलेल्‍या कोरोनाबाधितांची संख्या १५ हजार २४२ वर पोचली आहे. 
शनिवारी झालेल्‍या आठ मृतांमध्ये तीन नाशिक शहरातील तर, पाच रुग्ण नाशिक ग्रामीण भागातील आहेत. 

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती

पाच हजार १०१ अहवाल प्रलंबित 
जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पाच हजार १०१ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीणमधील दोन हजार ८१४, नाशिक शहरातील एक हजार ३२५, मालेगावच्‍य ९६२ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणातील दोन हजार ४५० रुग्‍ण दाखल झाले आहेत. यापैकी नाशिक महापालिका हद्दीतील दोन हजार ३०९ रुग्ण आहेत. जिल्‍हा रुग्‍णालयात आठ, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात सात रुग्‍ण दाखल झाले. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा