नाशिक महापालिकेकडून गतवर्षीच्या तुलनेत 22 कोटींची रेकॉर्डब्रेक वसुली

नाशिक महानगरपालिका www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेकडून नियमित करदात्यांसाठी एप्रिल महिन्यात सुरू केलेल्या मालमत्ताकर सवलत योजनेला नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिल्याने 30 दिवसांत रेकॉर्डब्रेक 51 कोटी 56 लाखांची वसुली झाली. गतवर्षी हा आकडा 29 कोटी इतका होता. म्हणजे यंदा वसुलीत तब्बल 22 कोटींनी वाढ झाली आहे.

महापालिकेच्या उत्पन्नात मालमत्ताकर प्रमुख साधन आहे. गतवर्षी मार्च अखेरच्या टप्प्यात जोरदार गिअर टाकत करसंकलन विभागाने वसुली मोहीम राबविली होती. आयुक्तांनी दिलेले उदिद्ष्ट पार करत 188 कोटी मालमत्ता कर वसूल झाला होता. ते पाहता आयुक्तांनी करसंकलन विभागाला सन 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी 200 कोटी मालमत्ताकर वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे, तर पाणीपट्टीचे 75 कोटी वसुलीचे उद्दिष्ट आहे. या अंतर्गत दरवर्षी एप्रिल महिन्यात मनपा नियमित करदात्यांसाठी मालमत्ताकर सवलत योजना राबविते. एप्रिलमध्ये मालमत्ताकर भरल्यास आठ टक्के घसघशीत सूट दिली. तसेच ऑनलाइनसाठी सर्वसाधारण करात 5 टक्के सवलत लागू केलेली आहे. या योजनेला नागरिकांचा बंपर प्रतिसाद लाभला आहे. दि. 1 ते 30 एप्रिल या कालावधीत तब्बल 51 कोटी 56 लाख मालमत्ताकराचा भरणा झाला. तब्बल एक लाख 25 हजारांहून अधिक नागरिकांनी योजनेचा लाभ घेत दोन कोटी 75 लाखांहून अधिक सवलत पदरात पाडली. नवीन नाशिकमधील नागरिक सवलत योजनेचा लाभ घेण्यात आघाडीवर आहेत. नागरिकांना योजनेचा लाभ घेता यावा म्हणून शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी भरणा केंद्र सुरू ठेवले होते.

विभागनिहाय करदाते
सातपूर : 12 हजार 689
ना. पश्चिम : 16 हजार 81
ना. पूर्व : 24 हजार 530
पंचवटी : 20 हजार 805
नवीन नाशिक : 32 हजार 345
नाशिकरोड : 22 हजार 489

हेही वाचा:

The post नाशिक महापालिकेकडून गतवर्षीच्या तुलनेत 22 कोटींची रेकॉर्डब्रेक वसुली appeared first on पुढारी.