नाशिक महापालिकेकडून दीड लाख कोव्हिशिल्डची नोंदणी; कोविड सेंटरही पुन्हा सुरु 

नाशिक  : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने तीस वैद्यकीय पथकांची निर्मिती बरोबरच रॅपिड ॲक्शन टीमही सज्ज केली असून लसीकरणासाठी कोव्डिशिल्डचे दीड लाख डोसची शासनाकडे मागणी नोंदविण्यात आली आहे. तर, यापूर्वी बंद करण्यात आलेले दोन कोविड सेंटर पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. 

गेल्या आठवड्यात शहरात सहा हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने नाशिक नव्याने कोरोनाचा हॉटस्पॉट ठरताना दिसत आहे. 
त्यामुळे पालिका प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात आल्या असून किराणा, मेडिकल दुकानदार, फळ व भाजी विक्रेते, सलून चालकांच्या स्वॅब तपासणी मोहीम राबविली जात आहे. तपासणीसाठी सहा विभागात प्रत्येकी पाच याप्रमाणे तीस पथके तैनात करण्यात आली आहेत. पथकांसोबतच रॅपिड ॲक्शन टीमही सज्ज ठेवण्यात आली आहे. महापालिकेकडे सध्या कोव्हिक्सिनचे पंधरा हजार डोस आहेत. परंतु, येत्या काही दिवसात तुटवडा भासण्याची शक्यता असल्याने कोव्हिशिल्डचे दीड लाख डोसची मागणी महापालिकेने शासनाकडे नोंदविली असल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. 

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना

पाचशे खाटांचे कोविड सेंटर पुन्हा सुरु 

मागील वर्षी महापालिकेने कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी एप्रिल महिन्यात बिटको रुग्णालय, डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, समाजकल्याण वसतिगृह, मेरी, तपोवन, ठक्कर डोम येथे कोविड सेंटर्स उभारले होते. परंतु, कोरोनाचा वेग मंदावल्याने समाजकल्याण वसतिगृह, मेरी, तपोवन व ठक्कर डोम येथील कोविड सेंटर्स बंद केले होते. कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढू लागल्याने समाजकल्याण वसतिगृहात पाचशे खाटांचे कोविड सेंटर पुन्हा सुरु करण्यात आले आहे, तर मेरी, तपोवन येथील कोविड सेंटरही सुरू केले जाणार आहे.

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा