नाशिक : महापालिकेकडून वर्षभरात सव्वादोन टन प्लास्टिक जप्त

plastic www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेने गेल्या वर्षभरात 409 केसेसच्या माध्यमातून 2,252 किलो म्हणजे जवळपास सव्वादोन टन इतके प्लास्टिक जप्त करून संबंधितांकडून 21 लाख 55 हजारांचा दंड वसूल केला आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने प्लास्टिक बंदी मोहिमेची कडक अंमलबजावणी केली आहे. मनपाच्या सहा विभागांमार्फत ही कारवाई करण्यात आली. मनपाचे पथक प्लास्टिक बाळगणार्‍यांवर सातत्याने कारवाई करत आहे. दुसरीकडे ‘एकच ध्यास ठेवू या, प्लास्टिक पिशवी हटवू या, समृद्ध पर्यावरणाचे रक्षण करू या’ या घोषवाक्यानुसार जनजागृतीही केली जात आहे. ‘गुडबाय सिंगल यूज प्लास्टिक, आता आपल्यामुळेच फरक पडेल’ हा विचार रुजवला जात आहे. ‘हरित नाशिक-स्वच्छ नाशिक’चे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मनपाच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती केली जात आहे. शहरातील स्वच्छता मोहिमांमधून प्लास्टिक न वापरण्याची सूचना नागरिकांना, दुकानदारांना सातत्याने केली जात आहे. पानटपरीवर तंबाखूजन्य पदार्थ देण्याकरिता वापरला जाणारा खर्रा पन्ना वापरू नये, तसेच फळविक्रेते, मांसविक्रेते यांनीही सिंगल यूज प्लास्टिक वापरू नये, असे आवाहन मनपाने केले आहे. प्लास्टिक बाळगणारे किंवा विकणार्‍यांना पहिल्यांदा पाच हजार, दुसर्‍यांदा दहा हजार, तर तिसर्‍यांदा प्लास्टिकची विक्री किंवा खरेदी केल्यास 25 हजारांचा दंड आकारला जात आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या सूचनेनुसार, मनपाच्या सहा विभागांत दररोज कारवाई सुरू आहे. दिवाळीतही सुमारे 5000 किलो प्लास्टिक जप्त करीत मनपाने विशेष स्वच्छता मोहीमही राबविली होती. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विद्यमानेही मनपाने प्लास्टिक बंदी मोहीम राबविली आहे. नवीन वर्षामध्ये सिंगल यूज प्लास्टिक वापरणार नाही, असा संकल्प नागरिकांनी करावा, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाने केले आहे.

अन्य उद्योगांना पुरवठा
शहरातून जमा झालेल्या प्लास्टिकचे रिसायकलिंग केले जाते. पाथर्डीजवळील नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पात या प्लास्टिकवर प्रक्रिया होते. एका प्रोजेक्टमध्ये प्लास्टिकपासून ग्रॅन्युअल्स म्हणजेच बारीक दाणे केले जातात. इतर कंपन्यांना ते देऊन त्यापासून पुनरुत्पादन केले जाते, तर दुसर्‍या प्रकल्पात सुका कचर्‍यातून जमा झालेल्या प्लास्टिकमधून इंधननिर्मिती केली जाते. त्याला ‘आरडीएफ’ म्हणजेच ‘रिफ्युज डिरॅव्हड फ्युएल’ म्हटले जाते. हे आरडीएफ सिमेंट उद्योगाला पुरविले जाते.

हेही वाचा:

The post नाशिक : महापालिकेकडून वर्षभरात सव्वादोन टन प्लास्टिक जप्त appeared first on पुढारी.