
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ठिकठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून येत असले, तरी त्याचे प्रमाण अल्प असल्याने गेल्या अडीच वर्षांपूर्वी उभारलेली कोविड केअर सेंटर्स बंद करण्याबाबतचा विचार मनपाच्या आरोग्य वैद्यकीय विभागाकडून केला जात आहे. त्यानुसार आयुक्तांच्या मान्यतेकरता प्रस्ताव सादर केला जाणार असून, संभाजी स्टेडियम आणि ठक्कर डोम येथील कोविड सेंटर्स ‘जैसे थे’ ठेवण्यात आल्याने ते मोकळे केले जाणार आहेत.
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून सर्वच जण कोरोना प्रादुर्भावाचा सामना करत आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये तर सुमारे चार लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती, तर आठ हजारांहून अधिक लोक कोरोनाचे बळी ठरले. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्याने तिसऱ्या लाटेला रोखण्यात यश आले. परंतु, त्यानंतरही आता काेरोनाचे रुग्ण बहुतांश ठिकाणी आढळत असल्याने कोरोनाबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. त्या अनुषंगाने आता बूस्टर डोस देणे वाढवले आहे, त्या बरोबरच कोविड चाचण्यांच्या प्रमाणात वाढ केली आहे. कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने राज्य शासनाने केलेल्या सूचनेनुसार तसेच स्थानिक पातळीवरील नियोजनाच्या दृष्टीने नाशिक शहरात असलेली कोविड केअर सेंटर्स ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी घेतला होता. तत्पूर्वी महापालिकेच्या ताब्यात असलेले समाजकल्याण वसतिगृह आणि मेरीच्या इमारतीती कोविड सेंटर गेल्या फेब्रुवारीमध्येच हस्तांतरित करण्यात आले असून, संभाजी स्टेडियम आणि ठक्कर डोम येथील सेंटरबाबत ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्यात आली आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढल्यास ऐनवेळी धावपळ नको, या दृष्टीने संबंधित दोन्ही ठिकाणची सेंटर्स अद्याप बंद करण्यात आली नसली, तरी येत्या काळात ती बंद करण्याबाबत आरोग्य वैद्यकीय विभागाकडून निर्णय घेतला जाणार आहे. नूतन बिटको रुग्णालयातील कोविड संदर्भातील व्यवस्था बदलून त्या ठिकाणी आंतर व बाह्य रुग्ण तपासणी आणि उपचाराचे काम सुरू करण्यात आले आहे.
झाकिर हुसेनमध्ये १८ रुग्ण
ठक्कर डोम आणि संभाजी स्टेडियम येथील कोविड सेंटर्समध्ये जवळपास दीड हजार इतके बेड असून, संभाजी स्टेडियम येथे ५०० पैकी ३०० आॉक्सिजन बेड आहेत. सध्या झाकिर हुसेन रुग्णालयात केवळ १८ कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील नऊ रुग्ण पॉझिटिव्ह, तर नऊ रुग्ण निगेटिव्ह आहेत. त्याचप्रमाणे अंबड येथे औद्योगिक संघटनांच्या माध्यमातून मनपाने जम्बो कोविड केअर सेंटर उभारले होते. मात्र, संभाव्य तिसरी लाट न आल्याने या सेंटर्सचा अद्याप उपयोग होऊ शकला नाही.
संभाजी स्टेडियम आणि ठक्कर डोम ही दोन्ही सेंटर्स बंद करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे. सध्याच्या रुग्णांची संख्या पाहता, संबंधित दोन्ही सेंटर्सची आवश्यकता नाही. झाकिर हुसेन आणि अंबड येथे गरज पडल्यास तूर्त व्यवस्था आहे. – डाॅ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, मनपा
हेही वाचा:
- पिंपरी : पवना बंद जलवाहिनीचा प्रश्न 11 वर्षांपासून ‘पाण्यात’
- Richa chadha : लग्नाआधी Pretty look, यलो साडीमध्ये नटली रिचा
- पिंपरी : आपसात हाणामारी करीत वाहनांची तोडफोड; विठ्ठलनगर येथील घटना
The post नाशिक : महापालिकेची कोविड सेंटर्स ‘लॉक’डाउनच्या मार्गावर! appeared first on पुढारी.