नाशिक महापालिकेची जप्ती टळली; काँग्रेसच्या मदतीला धावली शिवसेना! 

नाशिक : राज्यातील सत्तेत महाविकास आघाडी म्हणून शिवसेना व काँग्रेसमध्ये विविध मुद्द्यांवरून मतभेद निर्माण होत असताना, नाशिक महापालिकेत मात्र काँग्रेसच्या मदतीला शिवसेना धावून आली. काँग्रेस कमिटीची नऊ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कमेची थकीत घरपट्टी भरण्यासाठी शिवसेनेच्या एका नगरसेवकाने आर्थिक मदतीचा हात दिला. 

काँग्रेसच्या मदतीला धावली शिवसेना 
शहराच्या मध्यवर्ती भागातील महात्मा गांधी रस्त्यावर काँग्रेस कमिटीचे कार्यालय आहे. दर वर्षी कमिटीची घरपट्टी थकीत असल्याने महापालिकेकडून जप्तीची नोटीस बजावली जाते. स्थायी समिती किंवा अन्य मोठे पद दिलेल्या नगरसेवकांकडे घरपट्टी भरण्याची अलिखित जबाबदारी असते. अनेक वर्षांपासून घरपट्टी भरण्याचा शिरस्ता आहे. मात्र, या आर्थिक वर्षात हा शिरस्ता मोडला. घरपट्टीची नऊ लाख ३३ हजार रुपयांची थकबाकी भरली जात नसल्याने महापालिकेने कारवाईची नोटीस बजावली होती.

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

थकीत घरपट्टीचा भरणा; महापालिकेची जप्ती टळली 

त्यावेळी काँग्रेसचे काही नगरसेवक एकत्र येऊन यासंदर्भात आयुक्तांची भेट घेत कारवाई न करण्याची विनंती केली होती. मुदत देऊनही घरपट्टी अदा केली नाही. मध्यंतरी महापालिकेने थकबाकीदारांसाठी सवलत योजना जाहीर केली होती. त्याद्वारे घरपट्टी भरता आली असती. मात्र, ती भरली न गेल्याने महापालिकेने कारवाईचा निर्णय घेतला होता. घरपट्टी कोणी अदा करावी, यावरून काँग्रेसमध्येच वाद निर्माण झाला होता. ठरलेल्या शिरस्त्याप्रमाणे ज्या नगरसेवकावर जबाबदारी होती त्यांनी हात वर केल्याने वादाला तोंड फुटले होते. अखेरीस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यापर्यंत वाद पोचला. त्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकाच्या बंधूने पुढाकार घेत वाद मिटवत स्वतःहून सवलत योजनेत घरपट्टी अदा केल्याने मार्च २०२१ पर्यंत काँग्रेस कमिटीचा घरपट्टीचा तिढा मिटला आहे. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

कमिटीचे ‘दिवे’ विझता राहिले 
काँग्रेस नगरसेवकाच्या ज्या भावाने घरपट्टी अदा केली ते शिवसेनेचे नगरसेवक आहेत. राज्य सरकारमध्ये महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना व काँग्रेसमध्ये काही विषयांवरून वैचारिक मतभेद असले तरी महापालिकेच्या कारवाईमुळे काँग्रेस कमिटीचे ‘दिवे’ विझविण्यापासून वाचल्याची खुमासदार चर्चा महापालिका वर्तुळात आहे.