नाशिक : महापालिकेच्या अंदाजपत्रकाला फेब्रुवारी उजाडणार

नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विधान परिषद पदवीधर निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे महापालिकेचे अंदाजपत्रक लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे मनपा आयुक्तांकडून फेब्रुवारीपर्यंत अंदाजपत्रक सादर केले तरी ते स्थायी समिती आणि महासभेवर येईपर्यंत विलंब होणार आहे. आगामी २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकासह चालू आर्थिक वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक मंजुरीच्या प्रक्रियेला आता फेब्रुवारी उजाडणार आहे. यामुळे जमा-खर्चाचा ताळेबंद सादर करण्यास खातेप्रमुखांना दिलासा मिळणार आहे.

मनपा आयुक्तांमार्फत दरवर्षी फेब्रुवारीअखेर स्थायी समितीकडे मान्यतेसाठी अंदाजपत्रक सादर केले जाते. स्थायी समितीकडे अंदाजपत्रक गेल्यानंतर त्यावर निर्णय होण्यास एक ते दीड महिन्याचा कालावधी जातो. त्यामुळे स्थायीकडून अंदाजपत्रक मार्चअखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात महासभेकडे मंजुरीसाठी सादर केले जाते. महासभेवर निर्णय होताना मे महिना उजाडतो. त्यामुळे अंदाजपत्रकावर अंतिम निर्णय होईपर्यंत मोठा कालावधी निघून जातो. सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू असल्याने स्थायी समिती आणि महासभा दोन्ही महत्त्वाच्या सभा आयुक्तांच्याच अध्यक्षतेखाली आहेत. त्यामुळे विलंब लागणार नसला तरी पदवीधर निवडणूक आचारसंहितेमुळे प्रशासकांसमोरदेखील अंदाजपत्रक सादर करण्याबाबतचा प्रश्न निर्माण झाला आहे. २०२२-२३ या वर्षासाठी तत्कालीन आयुक्तांनी २,२२७ कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केले होते. स्थायी समितीने त्यात ३३९ कोटी ९७ लाखांची वाढ केली होती. स्थायीच्या अंदाजपत्रकाला महासभेकडून मान्यता मिळण्यापूर्वीच महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाली. त्यामुळे स्थायी आणि महासभा असे दोन्हींचे अंदाजपत्रक अस्तित्वात आले नाही. आयुक्तांनी चालू वर्षाचे सुधारित व पुढील वर्षाचे अंदाजपत्रक जानेवारीअखेर मंजुरीसाठी कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे स्थायी समितीची बैठक घेऊन अंदाजपत्रक मंजूर करता येणार नाही. त्यामुळे अंदाजपत्रकाच्या नियोजित कार्यक्रमानुसार फेब्रुवारी महिना उजाडणार आहे.

दरवर्षी डिसेंबर महिन्यात मनपाकडून सुधारित अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया सुरू होत असते. त्यासाठी खातेप्रमुखांकडून मंजूर तरतूद आणि झालेला खर्च, शिल्लक निधी तसेच किती निधी अखर्चित राहू शकतो, याविषयीची माहिती घेतली जाते. अंदाजपत्रक तयार होण्यापूर्वी प्रत्येक नगरसेवकांकडून आपापल्या प्रभागातील विकासकामे तसेच प्रस्ताव सादर केले जातात. त्यावर प्रशासनाकडून अंमलबजावणी करून आर्थिक तरतूद केली जाते. सध्या प्रशासकीय राजवट असल्याने नगरसेवकांना प्रस्ताव सादर करता येत नसले तरी काही नगरसेवक आपापले वजन वापरून राजकीय दबावात प्रशासनाला आपली कामे अंदाजपत्रकात टाकण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : महापालिकेच्या अंदाजपत्रकाला फेब्रुवारी उजाडणार appeared first on पुढारी.