नाशिक : महापालिकेच्या जागेवर उभारली व्यावसायिक इमारत

मनपाच्या जागेवर बिल्डरचे बांधकाम,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गंगापूर रोडवरील आनंदवली शिवारात महापालिका मालकीच्या असलेल्या जागेवर व्यावसायिक इमारत उभारण्याचा प्रकार उघडकीस आला असून, यासंदर्भात मनपाच्या नगर रचना विभागाने संबंधितांना दुसर्‍यांदा नोटीस बजावली आहे, तर दुसरीकडे या प्रकरणी सिटी सर्व्हे कार्यालयातून संबंधित जागेच्या नोंदीच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.

आनंदवली शिवारात मनपाच्या मालकीची 18 गुंठे जागा असून, या स. क्र. 67 असलेल्या जागेबाबत मनपाच्या नावाचा सातबारा उतारादेखील आहे. असे असताना मनपाच्या जागेवर एका बांधकाम व्यावसायिकाने व्यावसायिक इमारत उभारून मनपाची फसवणूक केल्याचा आरोप तथा तक्रार मनपाकडे करण्यात आली आहे. मनपा भूखंडाला लागूनच सर्व्हे क्रमांक 61 ब आहे. 30 मीटर रुंदीच्या रस्त्यावर असलेला भूखंड रस्ता रुंदीकरणात गेला आहे. असे असताना स. क्र. 61 ब वर इमारत असल्याचे दर्शविण्यात आले आहे. परंतु, प्रत्यक्षात संबंधित व्यावसायिक इमारत मनपाच्या भूखंडावर उभारण्यात आलेली असल्याचा आरोप माजी नगरसेवक अनिल चौघुले यांनी केला आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार नगर रचना विभागाने आर्चित बिल्डर्सला दुसर्‍यांदा नोटीस बजावली असून, यासंदर्भात चौगुले यांनी मनपाकडून केवळ नोटिसींचा सोपस्कार का पार पाडला जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

दरम्यान, स. क्र. 67 या 18 गुंठे क्षेत्रफळ असलेला भूखंड मनपाचा असताना कागदावर मात्र ही जागा बांधकाम व्यावसायिकाचीच असल्याचे दर्शविले जात असल्याने मनपाचे आर्थिक नुकसान करण्यात आले आहे. तसेच जागेवर व्यावसायिक इमारत बांधून 75 कोटी रुपयांचा फायदा संबंधितांनी करून घेतल्याचा आरोप चौगुले यांनी केला आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या संबंधित जागेची सिटी सर्व्हे नकाशावरील नोंदच गायब केल्याचा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा :

The post नाशिक : महापालिकेच्या जागेवर उभारली व्यावसायिक इमारत appeared first on पुढारी.