नाशिक : महापालिकेच्या ५६ जागांसाठी ३४२ डॉक्टर्सच्या मुलाखती

Doctor

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; महापालिकेच्या रुग्णालयांमधील डॉक्टर्सच्या ५६ जागांवरील मानधन तत्त्वावरील भरतीसाठी गेल्या दोन दिवसांत ३४२ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. महापालिकेच्या या मानधन भरतीकडे तज्ज्ञ डॉक्टरांनी पाठ फिरवली असली तरी, बीएएमएसच्या २० पदांसाठी मात्र तब्बल २६६ डॉक्टर्सनी महापालिकेत मानधनावर काम करण्याची तयारी दर्शवली आहे.

महापालिकेच्या माध्यमातून पाच मोठ्या रुग्णालयांसह ३० शहरी आरोग्य सेवा केंद्रे चालविली जातात. येत्या काळात १०५ आरोग्य उपकेंद्रेही सुरू केली जाणार आहेत. शहर, परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे महापालिकेच्या रुग्णालयांवरील ताणही वाढत आहे. मात्र डॉक्टरांच्या १८९ मंजूर पदांपकैी जेमतेम ६५ डॉक्टर कार्यरत असून, १२४ रिक्त पदांमुळे रुग्णसेवेत अडचणी येत आहेत. डॉक्टरांअभावी रुग्णांची हेळसांड होत आहे. आरोग्य-वैद्यकीय व अग्निशमन विभागातील नोकरभरतीला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. नोकरभरतीसाठी महापालिकेने टीसीएस या कंपनीची नियुक्ती केली आहे. मात्र टीसीएसला अ संवर्गातील पदभरतीची परवानगी नाही. ब, क व ड संवर्गातील पदभरती प्रक्रियेची तयारी टीसीएसमार्फत सुरू आहे.

डॉक्टरांची पदे ही अ संवर्गात मोडतात. त्यामुळे डॉक्टरांची भरती प्रक्रिया टीसीएसमार्फत करावी की, एमपीएससीमार्फत याबाबत महापालिका प्रशासनाने शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे. परंतु अद्यापही मार्गदर्शन प्राप्त होऊ शकलेले नाही. त्यामुळे तूर्त मानधनावर भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. डॉक्टरांची ५६, तर परिचारिकांची ४० पदे मानधनावर भरली जात आहेत. यासाठी अर्ज मार्गविले होते. पात्र अर्जदारांना मुलाखतीसाठी पाचारण केले होते. त्यात स्टाफनर्सच्या २० पदांसाठी ५१९ तर एएनएमच्या २० जागांसाठी ६९१ अर्ज आले असून त्यांची छाननी सध्या सुरू आहे.

विशेषज्ञांच्या भरतीला अल्प प्रतिसाद

बीएएमएस तसेच परिचारिकांच्या भरतीसाठी इच्छुकांचा मोठा प्रतिसाद लाभला असला, तरी विशेषज्ञ डॉक्टरांच्या भरतीला मात्र अत्यल्प प्रतिसाद लाभला. शल्य चिकित्सकांच्या दोन जागांसाठी दोन, फिजिशियनच्या चार जागांसाठी तीन, स्त्रीरोगतज्ज्ञांच्या पाच जागांसाठी सात, बालरोगतज्ज्ञांच्या पाच जागांसाठी पाच, क्ष किरण तज्ज्ञांच्या दोन जागांसाठी एक, ॲनेस्थेशियाच्या दोन जागांसाठी एक, नाक, कान, घसा तज्ज्ञांच्या दोन जागांसाठी एक, मानसोपचार तज्ज्ञांच्या एका जागेसाठी अवघ्या एका उमेदवाराची मुलाखत घेण्यात आली.

हेही वाचा :

The post नाशिक : महापालिकेच्या ५६ जागांसाठी ३४२ डॉक्टर्सच्या मुलाखती appeared first on पुढारी.