नाशिक : महापालिकेतर्फे पुन्हा होणार शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण

शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत नाशिक शहरासह परिसरात दि. 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत पुन्हा एकदा शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शिक्षण विभागाने मनपाचे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक तसेच अंगणवाडी मुख्यसेविकांना परिपत्रक पाठवून सर्वेक्षण करण्याचे निर्देश प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी दिले आहेत.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्क अधिनियमातील तरतुदीनुसार स्थलांतरित मुलांना शिक्षण हमी कार्ड देण्याची तरतूद करण्यात आली असून, त्याद्वारे शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. विविध कारणांमुळे स्थलांतरित होणार्‍या कामगार तसेच कर्मचार्‍यांच्या बालकांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी व्यापक स्वरूपात सर्वेक्षण घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचना परिपत्रकाद्वारे केली आहे. शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करताना नोव्हेंबरमध्ये नियमित स्थलांतरित होत असलेल्या पालकांच्या घरोघरी जाऊन पूर्ण करण्यात येणार आहे. वय वर्ष 3 ते 18 या वयोगटातील बालकांना शाळेत प्रवेशित करून त्यांचे शिक्षण सामान्य विद्यार्थ्यांसोबत सुरू होईल. सर्वेक्षणाची मोहीम वीटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने, शेतमजूर, औद्योगिक वसाहती तसेच अशा उद्योगांच्या ठिकाणी की जेथे स्थलांतरित मजूर व कामगार येतात, अशा ठिकाणी सर्वेक्षण राबविण्यात येणार आहे.

उपाययोजना व अंमलबजावणी यासाठी केंद्रस्तरावर नियंत्रक कक्ष स्थापन करण्यात येईल. त्याचे सदस्य केंद्रप्रमुख असतील तर बालरक्षक शिक्षण केंद्राअंतर्गत शाळेचे मुख्याध्यापक सचिव म्हणून काम पाहतील आणि तेच जबाबदार असतील.
– सुनीता धनगर, प्रशासनाधिकारी- मनपा शिक्षण विभाग

स्थलांतरित मुलांना प्रोत्साहन भत्ता
स्थलांतरित मुलांना शिक्षण हमी कार्ड देऊन त्यांचे शंभर टक्के प्रवेश स्थलांतरित परिसरातच होतील यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. शंभर टक्के स्थलांतरित मुलांचे आधारकार्ड, यु डायस प्लस, स्टुडंट पोर्ट प्रणालीसोबत संलग्न करून स्थलांतरित ठिकाणी असलेल्या स्थानिक शाळा यासारख्या व्यवस्थेस कळविण्याची सूचना मनपा प्रशासनाधिकारी धनगर यांनी केली आहे. स्थलांतरित होऊन येणार्‍या बालकांची शाळेतील उपस्थिती टिकून ठेवण्यासाठी शासन नियमानुसार प्रोत्साहन भत्ता, उपस्थिती भत्ता देण्यात यावा तसेच लेखन साहित्यासाठी स्वतंत्र तरतूद करण्याची सूचना केली आहे.

मागील वेळी 49 शाळाबाह्य मुले
शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर राबविण्यात आलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात महापालिकेला 49 शाळाबाह्य मुले आढळून आली होती. यानंतर आता पुन्हा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत सर्वेक्षण राबविण्यात येत आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : महापालिकेतर्फे पुन्हा होणार शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण appeared first on पुढारी.