नाशिक महापालिकेत मानधनावर भरती; स्थायी समिती सभापतींकडून नियुक्तीच्या सूचना

नाशिक : स्थायी समितीने तातडीने भरतीचे आदेश शुक्रवारी (ता. २९) प्रशासनाला दिले. कर्मचाऱ्यांची सहा महिन्यांसाठी मानधनावर भरती केली जाणार असून, त्यासाठी आठवडाभरात जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश सभापती गणेश गिते यांनी वैद्यकीय विभागाला दिले.

नाशिक महापालिकेत मानधनावर भरती; स्थायी समिती सभापतींकडून नियुक्तीच्या सूचना 

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वैद्यकीय व आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती केल्यानंतर त्यांना मुदतवाढ देण्याबरोबरच वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्यासाठी ५१६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मानधनावर भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिका रुग्णालयांमध्ये अपुरे मनुष्यबळ असल्याने रुग्णांची हेळसांड होते. पायाभूत सुविधा पुरविल्या जात असल्या, तरी मनुष्यबळ नसल्याने पूर्ण क्षमतेने उपचार होत नाहीत. कोरोना काळात महापालिकेने मानधनावर वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती केली. मात्र, त्यांची मुदत संपल्याने रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी नसल्याची बाब सुप्रिया खोडे व समिना मेमन यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मांडली. त्यानुसार वैद्यकीय विभागाने सविस्तर अहवाल सादर केला. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सध्या ६६ डॉक्टर असून, यात ४७ कायम, चार मानधनावर, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १४ डॉक्टरांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त ४३ डॉक्टरांची गरज आहे.

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

 मानधनावर नियुक्तीच्या सूचना

रुग्णालयांमध्ये डॉक्टरांव्‍यतिरिक्त ४३८ कायम, मानधनावरील १२८, तर राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १९६ डॉक्टर, असे एक हजार ४७७ वैद्यकीय कर्मचारी कार्यरत आहे. त्याव्यतिरिक्त ५१६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याची बाब वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर ४३ वैद्यकीय अधिकाऱ्यांना तीन वर्षे, तर अन्य कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांच्या मुदतीवर मानधनावर नियुक्तीच्या सूचना स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी दिल्या. 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

सहा महिन्यांसाठी नियुक्ती 
स्थायी समितीने तातडीने भरतीचे आदेश शुक्रवारी (ता. २९) प्रशासनाला दिले. वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीन वर्षे, तर परिचारिका, आया, वॉडबॉय यांसारख्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सहा महिन्यांसाठी मानधनावर भरती केली जाणार असून, त्यासाठी आठवडाभरात जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश सभापती गणेश गिते यांनी वैद्यकीय विभागाला दिले