नाशिक महापालिकेत 36 जागांवर ओबीसी उमेदवार

नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अखेर ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी साधारण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेच्या 44 प्रभागांतील 133 जागांपैकी 104 सर्वसाधारण प्रवर्गाच्या जागेतून 36 जागांवर ओसीबी अर्थात, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या उमेदवारांना आरक्षण मिळणार आहे. त्यानुसार 104 खुल्या जागांसाठी नव्याने आरक्षण सोडत निघेल. 36 ओबीसी जागांतून 18 पुरुष आणि 18 महिलांच्या आरक्षणाचा समावेश असेल.

दरम्यान, 104 च्या जागांवर नव्याने महिला व खुल्या गटाचे आरक्षण काढण्यात येणार असून, या नव्या आरक्षणामुळे काही प्रस्थापितांना महिला आरक्षणाचा फटका बसू शकतो. नाशिकसह 18 महापालिका निवडणुकीची प्रक्रिया जानेवारी महिन्यापासून सुरू झाली. परंतु, 10 मार्च रोजी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. न्यायालयीन तिढा दूर झाल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींना वेग मिळणार आहे. तसेच आगामी तीन महिने राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू राहील.

सर्वोच्च न्यायालयामध्ये एप्रिलमध्ये झालेल्या सुनावणीनंतर स्थगिती उठविण्यात आली. मात्र, ओबीसी आरक्षणासह निवडणुका या राजकीय पक्षांची एकमुखी मागणी आणि पावसाळा यामुळे लांबणीवर पडल्या. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना अंतिम करणे, आरक्षण सोडत, प्रारूप मतदारयाद्यांचे विभाजन व प्रसिद्ध करून त्यावर हरकती सूचना मागविणे, अशा प्रकारची प्रक्रिया सुरू होती. हरकतींची दुरुस्ती करून अंतिम मतदारयादीचे काम सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा केल्याने आता ओबीसी आरक्षण कोण कोणत्या प्रभागात पडणार आणि त्यावरून राजकीय समीकरणे कशी बदलणार, याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

20 सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि.20) ओबीसी आरक्षणास हिरवा कंदील दाखविल्याने येत्या 50 ते 60 दिवसांमध्ये म्हणजे 20 सप्टेंबरपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागू शकते. न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुका असलेल्या महापालिकांना ओबीसी आरक्षण सोडत काढण्यासंदर्भातील सूचना केल्या जातील. आरक्षण सोडतीचा कार्यक्रम प्राप्त झाल्यानंतर 104 सर्वसाधारण जागांमधून 36 जागांवर ओबीसी आरक्षण काढले जाईल. त्यात महिला व पुरुषांसाठी प्रत्येक 18 जागा असतील.

प्रभाग 8 मध्ये दोन ओबीसी आरक्षण
44 प्रभागांपैकी 43 प्रभाग हे त्रिसदस्यीय तर एक प्रभाग चारसदस्यीय आहे. चारसदस्यीय प्रभाग क्र. 8 मध्ये दोन जागा या थेट ओबीसी आरक्षणासाठी असतील. त्रिसदस्यीय प्रभागातील अ आणि ब गटातील सर्वसाधारण जागांमधून काही ठिकाणी थेट पद्धतीने तर काही ठिकाणी सोडतीव्दारे ओबीसी आरक्षण निश्चित केले जाईल. यामुळे अशा पध्दतीने कोणकोणत्या प्रभागात महिला व पुरुष आरक्षण पडणार यावर बर्‍याच उमेदवारांच्या उमेदवारीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

प्रभागांवर एक नजर
प्रभाग – 44, त्रिसदस्यीय – 43, चारसदस्यीय -01,
एकूण जागा – 133
प्रवर्गनिहाय जागा –
खुल्या- 68, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)- 36, अनुसूचित जाती- 19, अनुसूचित जमाती- 10

अनुसूचित जाती जमातीचे प्रवर्ग
अनुसूचित जातीसाठी 7,11,12,14,15,20,22,23,24,25,27,26, 34,35,39,41,42,43,44 हे 19 प्रभाग, तर अनुसूचित जमातीसाठी 1,2,3,4,7,11,27,28,34,44 हे 10 प्रभाग आरक्षित आहेत. या प्रभागांमधील अ आणि ब गट काही प्रमाणात जागांवर आरक्षण असून, या दोन्ही प्रवर्गाचे आरक्षण तसेच संबंधित आरक्षणातील महिला व पुरुष यामध्ये कोणताही फेरबदल होणार नाही.

हेही वाचा :

The post नाशिक महापालिकेत 36 जागांवर ओबीसी उमेदवार appeared first on पुढारी.