“नाशिक महापालिकेवर भगवा फडकवणारच! मुंबईच्या धर्तीवर शिवसेनेच्या शाखा”

नाशिक : मुंबईत अनेक वर्षांपासून वास्तव्य करणारे व नव्याने राहण्यास येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला समस्या सोडविण्यासाठी शिवसेना शाखा जवळची वाटते. गटर, मीटर, वॉटरपासून सर्वच मूलभूत समस्या शाखांच्या मार्फत सोडविल्या जातात. त्याच धर्तीवर नाशिकमध्ये १२२ प्रभागांमध्ये शिवसेनेच्या शाखांची निर्मिती करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती शिवसेनेचे नवनिर्वाचित महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली. 

मुंबईच्या धर्तीवर शाखा सुरू करण्याचे नियोजन
महानगरप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बडगुजर यांनी ‘सकाळ’च्या सातपूर कार्यालयाला भेट दिली. ‘सकाळ’चे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी महानगरप्रमुखपद मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. या वेळी श्री. बडगुजर यांनी भविष्यकालीन योजनांची माहिती दिली. त्यात मुंबईच्या धर्तीवर शाखा सुरू करण्याचे नियोजन असल्यावर भर दिला. ते म्हणाले, की शिवसेना नव्या दमाचा पक्ष आहे. ज्या शिवसैनिकांनी पक्ष, संघटना बळकट करण्यासाठी योगदान दिले, त्यांचे योगदान लक्षात घेऊन पक्षाला अधिक वेगाने पुढे नेले जाईल.

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

Image may contain: 2 people

महापालिकेवर भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही

शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांची जयंती २३ जानेवारीला आहे. त्यापूर्वी शहरातील १२२ प्रभागांमध्ये शाखांची स्थापना, शाखांना क्रमांक देणे, जुन्या शाखांना नव्याने रूप देणे, जुन्या- नव्या शिवसैनिकांची यादी तयार करणे, महाविकास आघाडी सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोचविणे आदी कामांवर भर दिला जाईल. प्रभागनिहाय सोशल मीडिया प्रमुखांची नियुक्ती केली जाईल. २३ जानेवारीला जुन्या शिवसैनिकांचा पक्ष कार्यालयात कृतज्ञता सत्कार होणार आहे. सहा महिन्यांत संघटना पातळीवर नियोजन करून पक्ष बळकट केला जाईल. त्यानंतर महापालिका निवडणुकीत नव्या दमाने उतरून महापालिकेवर भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही. 

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..

‘दत्तक’ नाशिकची पिछेहाट 
२०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेत असल्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु सत्ताकाळात ते आश्‍वासनाला जागले नाहीत. नागपूर महापालिकेला जेवढा निधी मिळाला, त्या तुलनेत दोन टक्केदेखील निधी नाशिकला मिळाला नाही. उलट भाजपच्या सत्ताकाळात शहराची पिछेहाट झाली. स्मार्टसिटी कंपनीची पाच वर्षांची मुदत संपुष्टात येत असताना एकही मोठा प्रकल्प पूर्ण झालेला नाही. जे प्रकल्प पूर्ण झाल्याचे दाखविले जातात. त्यांची वाताहात झाली. त्यामुळे निवडणुकीत भाजपच्या कामकाजाचा पर्दाफाश करण्याबरोबरच शिवसेनेच्या माध्यमातून शाश्‍वत विकास हा मुद्दा मतदारासंमोर मांडणार असल्याचे श्री. बडगुजर यांनी सांगितले. 

दुबार नावे वगळणार 
मतदारयादीत दुबार नावे घुसविण्याचे प्रकार अधिक आहे. त्यामुळे पारदर्शकपणे निवडणुका होणार नाहीत. म्हणून महापालिकेच्या निवडणुकीत मतदारयादी अंतिम करताना दुबार नावे वगळण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. त्यासाठी विशेष मोहीम राबविणार असल्याचे बडगुजर यांनी सांगितले.