Site icon

नाशिक : महाराजांचा राजकारणासाठी वापर हीच शोकांतिका – खा. उदयनराजे भोसले

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा
श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगभरात साजरी केली जाते, ही अभिमानाची बाब असली, तरी काही लोक महाराजांचा वापर राजकारणासाठी करतात, ही मोठी शोकांतिका आहे, अशी खंत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.

नाशिक दौर्‍यावर असलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी सातपूर शिवजन्मोत्सव समितीला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. खा. उदयनराजे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि शौर्य 350 वर्षे झाली तरी कोणी विसरले नाही. भोसले घराण्यात माझा जन्म झाला, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने महाराजांबद्दल एकेरी उल्लेख केला होता. या गोष्टीचे वाईट वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे बोलणार्‍यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा. असेही खा. उदयनराजे म्हणाले. यावेळी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. समितीच्या वतीने कार्याध्यक्षा डॉ. वृषाली सोनवणे, उपाध्यक्षा रोहिणी देवरे यांनी औक्षण केले, तर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन गांगुर्डे, सहसचिव हेमंत घुगे, दीपक वाघचौरे यांनी सत्कार केला. यावेळी नितीन निगळ, निवृत्ती इंगोले, किशोर निकम, नरेश सोनवणे, रवींद्र देवरे यांच्यासह शिवजन्मोत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : महाराजांचा राजकारणासाठी वापर हीच शोकांतिका - खा. उदयनराजे भोसले appeared first on पुढारी.

Exit mobile version