नाशिक : ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा’ अंतर्गत आजपासून योग क्रीडा रंगणार

योग www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्याच्या क्रीडा संस्कृतीमध्ये आणि वैभवामध्ये भर टाकणार्‍या ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा’ अंतर्गत पंचवटील विभागीय क्रीडा संकुल येथे योग क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि. 2) चारदिवसीय योग क्रीडा स्पर्धा रंगणार असून, येत्या गुरुवार (दि. 5) पर्यंत या स्पर्धा रंगणार आहेत, माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी तथा विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजन समितीचे सचिव अविनाश टिळे यांनी दिली.

राज्यात क्रीडामय वातावरणनिर्मिती करून विविध खेळांना उत्तेजन देण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर आपले नैपुण्य दाखवित असलेल्या खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची जास्तीत जास्त संधी मिळावी. तसेच राष्ट्रीय खेळ स्पर्धेच्या दृष्टीने खेळाडूंची तयारी करण्यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून राज्यात विविध ठिकाणी मिनी ऑलिम्पिक स्पर्धेचे नियोजन करण्यात आले. त्याअंतर्गत नाशिकमध्ये योग क्रीडा स्पर्धा होत असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी टिळे यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी (दि. 2) सायंकाळी 6 ला पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुल येथे योग क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, अर्जुन पुरस्कार विजेते कविता राऊत, दत्तू भोकनळ, छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते नरेंद्र छाजेड, अविनाश खैरनार, श्रद्धा नालमवार, राजू शिंदे, वीरेंद्रसिंग, हेमंत पाटील आदींसह मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी टिळे यांनी सांगितले.

128 जणांचा राज्यभरातून ताफा…
योग क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील आठ विभागांतून 128 खेळाडू, मार्गदर्शक, प्रशिक्षक तसेच अधिकार्‍यांचा ताफा सहभागी होणार आहे. त्यामध्ये 37 महिला तर 31 पुरुष खेळाडू, 4 महिला संघ व्यवस्थापक तर 4 पुरुष संघ व्यवस्थापक, 3 महिला प्रशिक्षक, 5 पुरुष प्रशिक्षक, 34 ऑफिशियल्स, 10 तांत्रिक समिती पदाधिकारी तसेच विविध समिती सदस्य व स्वयंसेवक (36) आदींचा समावेश आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा’ अंतर्गत आजपासून योग क्रीडा रंगणार appeared first on पुढारी.