नाशिक : महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ जेव्हा आपल्या भाचीच्या लग्नात ठेका धरतात

नरहरी झिरवाळ www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा 

सध्या लग्नसराईची धूम सुरू असल्याने विवाह सोहळे अगदी दणक्यात सुरू आहेत. लग्न म्हटले की, कुटुंबीयांमध्ये मोठा उत्साह संचारलेला असतो. लग्न सोहळ्या आधी पार पडतो तो हळद समारंभ अन् या हळद समारंभात घरातील नातेवाईक, आप्तेष्ट व मित्रपरिवार अगदी मनमुरादपणे तल्लीन होऊन नृत्य करतात. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी देखील आपल्या नातेवाईकांच्या हळद समारंभात ठेका धरल्याचं पहायला मिळालं.

नातेवाईकच्या हळदीच्या समारंभात संबळ वाद्यावर नरहरी झिरवाळ यांनी पारंपारिक पद्धतीत ठेका धरला. त्यांनी पत्नीला खांद्यावर बसवून झिरवाळ यांनी पारंपारिक संबळ वाद्यावर ठेका धरल्याचं पहायला मिळालं. त्यांच्या या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विधानसभा उपाध्यक्ष असलेल्या नरहरी झिरवाळ यांच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पारंपारिक नृत्याची झलक आपल्याला या व्हिडीओमध्ये पहायला मिळेल.

साधी राहणीमान, मितभाषी आणि अभ्यासू नेते म्हणून नरहरी झिरवाळ यांची ओळख आहे. आदिवासी बहुल भागाचे प्रतिनिधित्व करणारे झिरवाळ अथक संघर्षातून पुढे आले आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होऊन राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. सर्व प्रक्रियेत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. झिरवळ यांची राहणीमान अत्यंत साधी आहे. आजही ते साध्या घरात राहतात. विधानसभेचे उपाध्यक्ष झाले तरी आजही ते शेती काम करत आहेत.

आमदार झिरवाळांचा जपानचा किस्सा
झिरवाळ हे नुकतेच जपानच्या (Japan) दौऱ्यावर पत्नीसह गेले होते. जपान दौऱ्याहून परतलेले झिरवाळ यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत जपान दौऱ्यातील कथन केलेला अनुभव चांगलाच गाजत आहे. सदरा, धोतर आणि पांढरी टोपी यावरच जपानमध्ये ते फिरले. पहिले दोन दिवस तर पैसे खर्च करावेत कसे हाच प्रश्न होता. यावेळी ते पत्नीसह स्वेटर खरेदीसाठी दुकानात गेले असताना इथल्या स्वेटरची किंमत पाहून झिरवाळ यांच्या पत्नी चकित झाल्या. त्या म्हणाल्या की, स्वेटर खरेदी जपानमध्ये नाहीतर नाशिकमध्ये (Nashik) करु असे सांगत स्वेटरच्या दुकानातून काढता पाय घेतला. फक्त नातवंडासाठी काही खेळणी घेतली आणि भारतात परतल्याचे नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

कोण आहेत नरहरी झिरवाळ?
नरहरी झिरवळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. दिंडोरी तालुक्यातील वनारे हे त्यांचं गाव. आदिवासी बहुल भागातील जनतेचे ते प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आणि हक्काचे कार्यकर्ते म्हणून नरहरी झिरवळ यांची ओळख आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ जेव्हा आपल्या भाचीच्या लग्नात ठेका धरतात appeared first on पुढारी.