Site icon

नाशिक: महाविद्यालयाला स्थळबिंदूस मिळाल्याने विद्यार्थ्यांची पायपीट कायमची बंद होणार : खा. हेमंत गोडसे

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील नायगाव येथील मराठा विद्याप्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान या महाविद्यालयास खासदार हेमंत गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शासनाने स्थळबिंदूस नुकतीच मान्यता दिली आहे. या महाविद्यालयाला स्थळबिंदू मिळाल्याने प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्गास आता लवकरच मान्यता मिळणार असल्याची आहे. नायगावसह पंचक्रोशीतील मुला – मुलींची पायपीट कायमची बंद होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

महाविद्यालयाच्या विस्तारीकरणाकामी काही महिन्यांपूर्वी ग्रामस्थांच्या एका शिष्टमंडळाने खासदार गोडसे यांची भेट घेत नायगाव येथील महाविद्यालयाच्या स्थळबिंदूस मान्यता मिळवून देण्याचे साकडे घातले होते. दोन महिन्यांपूर्वी खासदार गोडसे यांनी नायगाव येथील ग्रामस्थांना मंत्रालयात नेऊन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. महाविद्यालयात प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्गास मान्यता मिळण्याकामी स्थळबिंदू मिळणे किती गरजेचे आहे हे खासदार गोडसे यांनी ना. पाटील यांना पटवून दिले होते. अशाच प्रकारची मागणी राज्यातील विविध शिक्षण संस्थांकडून होत असून लवकरच नायगाव येथील महाविद्यालयाच्या स्थळबिंदूस मान्यता देण्यात येईल असे आश्वासन ना. पाटील यांनी खासदार गोडसे यांना मागील महिन्यात दिले होते. दरम्यानच्या काळात या महाविद्यालयास स्थळबिंदू देण्याबाबत पाठपुरावा केला होता. या विषयीचा अहवाल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शासनाला पाठविला होता. शासनाने 2023-24 साठी मंजूर केलेल्या वार्षिक योजनेनुसार नायगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या स्थळबिंदूस मान्यता दिली आहे. हा विषय मार्गी लागल्याने नायगाव येथील विद्यार्थ्यांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी कार्यालयात येत खासदार गोडसे यांचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार
नायगाव येथे मविप्र समाजाची कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय असून येथे पहिली ते बारावीपर्यंतच वर्ग भरतात. त्यामुळे बारावीनंतर प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्गात जाणार्‍या विद्यार्थ्यांना सुमारे तीन ते पाच किलोमीटर पायपीट करत इतर महाविद्यालयांमध्ये रोज जावे लागते. अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थळबिंदूचा विषय मार्गी लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा:

The post नाशिक: महाविद्यालयाला स्थळबिंदूस मिळाल्याने विद्यार्थ्यांची पायपीट कायमची बंद होणार : खा. हेमंत गोडसे appeared first on पुढारी.

Exit mobile version