नाशिक : महिलांनी केला निम्म्या तिकिटात बस प्रवास; महिला सन्मान योजनेला आजपासून सुरुवात

एसटी महामंडळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

९ मार्चला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिला सन्मान योजनेंतर्गत सर्व वयोगटांतील महिलांसाठी बस प्रवासात ५० टक्के सवलत जाहीर केली. त्याच्या अंमलबजावणीला राज्यभरात शुक्रवार (दि. १७) पासून सुरुवात झाली. महिलांनी योजनेचा लाभ घेत निम्म्या पैशांत बस प्रवास केला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य सरकारने ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. त्याआधी वयाची ६५ वर्ष पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठांना निम्म्या तिकिटात बस प्रवास करता येत होता. राज्य सरकार एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ टक्क्यांपासून ते १०० टक्केपर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. त्यानुसार विविध घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जात असते.

निफाडला बदली असल्याने दररोज नाशिक निफाड असा बस प्रवास करावा लागतो. पण आज दोन्ही बाजूने एका तिकिटाचे पैसे लागले. येणाऱ्या काळात त्याचा नक्कीच फायदा होईल. – सुरेखा पगार, नोकरदार.

महिला सन्मान योजनेतील सवलती अशा

*साधी, मिनी/मिडी, निमआराम, विनावातानुकूलित, शयन-आसनी, शिवशाही, शिवनेरी (साधी व वातानुकूलित) बसने प्रवास करता येणार.

*ही योजना महाराष्ट्र राज्याकरिता मर्यादित

*भविष्यात महामंडळाच्या ताफ्यात नव्याने सामील होणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेससाठी ही सुविधा लागू असणार

*आगाऊ तिकीट आरक्षित करणाऱ्यांना ५० टक्के सवलतीचा परतावा मिळणार नाही

*५० टक्के भाडे आकारले गेले असले तरी प्रवास भाड्यात आसन निधी व वातानुकूलित सेवांकरिता वस्तू व सेवा करांची रक्कम आकारण्यात येणार

*ही योजना शहरांतर्गत प्रवासासाठी लागू नाही

आज मी शिरपूर, धुळे असा साध्या बसने प्रवास केला. ३९ रुपये भाडे आणि १ रुपया आसन निधी असे एकूण ४० रुपये भाडे मला लागले. – मनीषा पवार, गृहिणी.

हेही वाचा:

 

The post नाशिक : महिलांनी केला निम्म्या तिकिटात बस प्रवास; महिला सन्मान योजनेला आजपासून सुरुवात appeared first on पुढारी.