नाशिक : महिला पोलिस थेट जंगलात शिरल्या, गावठी हातभट्ट्या उद्ध्वस्त

महिला पोलिस नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार ग्रामीण पोलिसांकडून अवैध व्यवसायविरोधी अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागात सुरू असलेल्या गावठी हातभट्टी व्यवसायांचे उच्चाटन करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांच्या चार विशेष प‌थकांची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक पथकात आठ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पथकांडून थेट जंगलात जाऊन गावठी हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत.

जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाचे औचित्य साधून दि. ९ ऑगस्टपासून ग्रामीण पोलिस दलातील महिला अंमलदारांची पथके गावठी हात्यवसायाच्या निर्मूलनासाठी पुढे सरसावल्या आहेत. गेल्या तीन आठवड्यांत या पथकातील महिला पोलिसांनी जिल्ह्यातील विविध भागांत डोंगर-दऱ्यांमध्ये छुपे ३२ हातभट्टी अड्डे शोधून ते नष्ट केले. या कारवाईत ३३ संशयितांविरोधात मुंबई दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, ११ लाख ९४ हजार १७० रुपयांची गावठी हातभट्टीची दारू, रसायन व साहित्य साधने हस्तगत करण्यात आली आहेत.

ग्रामीण पोलिसांच्या महिला अंमलदारांच्या गावठी हातभट्टीविरोधातील कारवाईचे स्वागत महिला वर्गाकडून होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेल्या हातभट्टी व्यवसायांच्या निर्मूलनासाठी चारही महिला पथके भविष्यातही कार्यरत राहणार असून, पोलिस पाटलांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही अवैध व्यवसायांविषयी माहिती असल्यास ६२६२२५६३६३ या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक उमाप यांनी केले आहे.

आतापर्यंतची कारवाई

-३२ गावठी हातभट्ट्या उद्ध्वस्त

-३३ संशयितांविरोधात गुन्हा दाखल

-१२ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

हेही वाचा :

The post नाशिक : महिला पोलिस थेट जंगलात शिरल्या, गावठी हातभट्ट्या उद्ध्वस्त appeared first on पुढारी.