नाशिक : मार्गदर्शन, नेतृत्व व लोकसहभाग ही ग्रामविकासाची त्रिसूत्री – राधाकृष्ण गमे

नाशिक : मार्गदर्शन, नेतृत्व व लोकसहभाग ही ग्रामविकासाची त्रिसूत्री - राधाकृष्ण गमे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सर्वांगीण ग्रामविकासासाठी अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन, गावातील ध्येयनिष्ठ नेतृत्व आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग या तीन बाबी आवश्‍यक आहेत, असे प्रतिपादन नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. सह्याद्री रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व सत्त्व फाउंडेशन, पुणे यांच्यातर्फे बुधवारी (दि. 19) मोहाडी क्लस्टरमधील 16 गावांतील सर्वांगीण ग्रामविकास कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. या ग्रामविकास प्रकल्पांतर्गत सर्वांगीण ग्रामविकासासाठी तयार करण्यात आलेला ग्रामविकास आराखडा आणि त्रिपक्षीय करारावर सत्त्व फाउंडेशन, पुणे, सह्याद्री रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन, नाशिक आणि संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच आणि उपसरपंच यांच्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या प्रकल्पासाठी गेली सुमारे चार वर्षे काम सुरू होते.

व्यासपीठावर सत्त्व फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सह्याद्री रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे संचालक विलास शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त गमे होते.

विभागीय आयुक्त गमे म्हणाले की, शेती आणि ग्रामविकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सह्याद्री फार्म्स व सत्त्व फाउंडेशन या संस्थांचा प्रभावी समन्वय मोहाडी क्लस्टरमधील 16 गावांना विकासाच्या वाटेवर पुढे नेईल. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळाले, गावात ध्येयनिष्ठ तरुणांचे नेतृत्व पुढे आले, तर आणि लोक एकत्र आले, तर गावात क्रांती घडते. त्यातूनच गावाचा सर्वांगीण विकास घडतो. शासनाकडून आता मोठ्या प्रमाणावर निधी हा थेट ग्रामपंचायतींकडे येतो. या अर्थाने ग्रामपंचायती सक्षम झाल्या आहेत. अशा परिस्थितीत गावाचा विकास आराखडा प्रत्यक्षात येणे शक्य आहे. राजकारण ठराविक काळापुरते मर्यादित ठेवावे नंतर विकासाला प्राधान्य द्यावे.

जिल्हा परिषद सीईओ आशिमा मित्तल म्हणाल्या की, सह्याद्री फार्म्स व सत्त्व फाउंडेशनच्या पुढाकारातून होत असलेले ग्रामविकासाचे कार्य कौतुकास्पद आहे. मोहाडी क्लस्टरमधील 16 गावे ही विकासाचे आदर्श मॉडेल म्हणून समोर येतील. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून सर्वतोपरी साह्य केले जाईल.

या प्रकल्पासाठी सातारा जिल्ह्यातील निढळ हे आदर्श गाव मॉडेल म्हणून केंद्रस्थानी ठेवले आहे. ‘निढळ’चे भूमिपुत्र व सत्त्व फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी यांनी मोहाडी क्लस्टरमधील ग्रामविकास प्रकल्पाची माहिती विस्ताराने सांगितली. गावाचा भौतिक विकास, आर्थिक विकास आणि मानव विकास ही सत्त्व फाउंडेशन प्रणीत ग्रामविकासाचे मुख्य घटक आहेत. त्या अंतर्गत गावात सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध करणे, प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढवत राहणीमान सुधारणे, तरुणवर्ग, विद्यार्थी, महिला, मागासवर्गीय, आदिवासी घटक, महिला यांच्या कल्याणाचे कार्यक्रम राबवणे, व्यसनमुक्त गाव आणि धार्मिक सदाचरण या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, असेही ते म्हणाले.

विलास शिंदे म्हणाले की, राज्यातील एकूण गावांची संख्या पाहता, आदर्श गावे म्हणून अगदीच मोजकी नावे डोळ्यासमोर येतात. याचे कारण तुलनेने शहरात संधी अधिक असतात. त्यातून ग्रामीण भागातील प्रत्येकाची ओढ ही शहराकडे जाण्याची असते. गावात संधी उपलब्ध झाल्याशिवाय हे चित्र बदलणार नाही. त्यासाठी फक्त एका गावाचा विकास हे ध्येय न ठेवता, एकाच वेळी अनेक गावांचा विकास हा क्लस्टर दृष्टिकोन समोर ठेवणे गरजेचे आहे. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी हीच संकल्पना मांडली आहे. मोहाडी क्लस्टर केंद्रस्थानी ठेवून याबाबत आमचे प्रयत्न सुरू आहेत.

The post नाशिक : मार्गदर्शन, नेतृत्व व लोकसहभाग ही ग्रामविकासाची त्रिसूत्री - राधाकृष्ण गमे appeared first on पुढारी.