Site icon

नाशिक : मालेगाव आगार 10 जूनपर्यंत चालविणार ज्यादा बसेस

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा
उन्हाळी सुट्ट्या आणि दाट लग्नतिथींमुळे बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्याबरोबरच उत्पन्नवाढीच्या द़ृष्टीने राज्य परिवहन महामंडळाने प्रमुख मार्गांवर जादा बसेस सोडल्या आहेत. मालेगाव आगाराने येत्या 10 जूनपर्यंत जादा बसफेर्‍या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

उन्हाळी सुट्ट्या लागताच गावी परतणार्‍या तसेच फिरस्तीवर निघणार्‍या प्रवाशांची सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे गर्दी होते. त्याचा एकूण व्यवस्थेवरही ताण पडतो. एसटीचा प्रवास सुरक्षित मानला जातो. तसेच शासनाने ज्येष्ठांना व महिलांना प्रवासी भाड्यात सवलत जाहीर केल्याने तर महामंडळाच्या बसेसला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. नियमित आणि हंगामी प्रवाशांचा वाढता ओघ लक्षात घेऊन सुट्टीच्या काळात जास्तीत जास्त बसगाड्या रस्त्यांवर धावतील, या द़ृष्टीने नियोजन केले जात आहे. मालेगाव आगारानेदेखील विशेष वेळापत्रक नुकतेच जाहीर केले. दि. 1 मे ते 10 जून दरम्यान राज्यातील वेगवेगळ्या गावांसह शहरांमध्ये एसटीच्या जादा बस धावणार आहेत. यामध्ये मालेगावहून पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर या शहरांसाठी जादा बसेस सोडण्यात येत आहेत. एसटीच्या उन्हाळी विशेष गाड्या सुरू झाल्या आहेत. पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या शहरांसाठी रोज विशेष फेर्‍या चालवण्यात येत असल्याची माहिती आगारप्रमुख मनीषा देवरे यांनी दिली. सुट्टीनिमित्त पर्यटनस्थळे, देवस्थाने येथे जाण्याकडे प्रवाशांचा मोठा कल असतो. 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास आणि महिलांना तिकीटदरात निम्मी सवलत मिळाल्याने प्रवासी संख्या वाढणार आहे. यामुळे यंदाच्या उन्हाळी हंगामात मोठी गर्दी उसळण्याचा अंदाज एसटी अधिकार्‍यांकडून व्यक्त होत आहे. मालेगाव आगारात 68 बसेस आहेत. त्यापैकी चार बसेस दुरुस्ती कामासाठी विभागीय कार्यशाळेत पाठविण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येते. सध्या 64 बसेस कार्यरत असून, या बसेसद्वारे वाढीव फेर्‍यांचे नियोजन केले जात आहे. शाळांना लागलेल्या सुट्ट्या व लग्न समारंभाच्या गर्दीमुळे मालेगाव आगाराच्या उत्पन्नात 15 ते 20 टक्के वाढ झाली आहे.

मालेगाव : येथील बसस्थानक आवाराची झालेली दुरवस्था. (छाया : सादिक शेख)

बसस्थानकाची दुरवस्था
मालेगाव बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मूलभूत सुविधा नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. शहरात दोन बसस्थानके आहेत. त्यात मध्य प्रदेश, गुजरात राज्यासह अनेक जिल्ह्यांतील बसेसची वर्दळ मोठी आहे. दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. बसस्थानकाच्या संरक्षण भिंतीची पडझड झाली आहे. स्थानकात पावसाचे पाणी साचले असून, दुर्गंधी पसरली आहे. प्लॅटफॉर्मवर बसेस लावण्यास जागा नसताना दुर्गंधीयुक्त डबक्यातच बसेस उभ्या केल्या जातात.

हेही वाचा:

The post नाशिक : मालेगाव आगार 10 जूनपर्यंत चालविणार ज्यादा बसेस appeared first on पुढारी.

Exit mobile version