नाशिक : मासिक पाळीमुळे वृक्षारोपणास मज्जाव, देवगाव येथील विद्यार्थिनीची तक्रार

मासिक पाळी

देवगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील कन्या आश्रमशाळेत इयत्ता बारावीत शिकणार्‍या विद्यार्थिनीला मासिक पाळी आली म्हणून शिक्षकाकडून वृक्षारोपण करण्यापासून रोखण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मासिक पाळी आलेल्या मुलींनी झाड लावलं तर ते झाड जळतं, असा अजब तर्क शिक्षकांनी लावल्याची तक्रार सदर मुलीने आदिवासी विकास विभागाकडे केली आहे.

साधारण आठ दिवसांपूर्वी शाळात वृक्षारोपण कार्यक्रम सुरू असताना सदर विद्यार्थिनीला मासिक पाळी आलेली असल्याचे समजल्यावर शिक्षकाकडून वृक्षारोपण करण्यापासून मज्जाव करण्यात आल्याची तक्रार विद्यार्थिनीने श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून केली आहे. मासिक पाळी ही नैसर्गिक बाब असून, सदर घटनेमुळे पुरोगामी महाराष्ट्रात महिलांना दुय्यम वागणूक मिळाल्याची भावना विविध संस्था, संघटनांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सुरवाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा प्रकारची घटना घडलीच नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने यंदा वृक्षारोपणच करण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे या घटनेतील सत्य चौकशीनंतरच समोर येणार आहे.

मासिक पाळीमुळे विद्यार्थिनीला वृक्षारोपणापासून रोखणे हे दुर्दैवी आहे. या प्रकरणाची नाशिक एकात्मिक आदिवासी विकासच्या प्रकल्प अधिकारी वर्षा मीना या चौकशी करत आहेत. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.
– संदीप गोलाईत,
अपर आयुक्त, नाशिक

महिला आयोगाकडून दखल
या घटनेची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आदिवासी विभागाच्या आयुक्तांबरोबरच पोलिस अधीक्षक तसेच महिला व बालविकासच्या विभागीय आयुक्तांनाही पत्र पाठविले आहे. पत्रात संबंधित शिक्षकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे तसेच कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. पुरोगामी महाराष्ट्रात एका शिक्षकाकडून अंधश्रद्धेस खतपाणी घालून मुलींच्या नैसर्गिक धर्माबाबत न्यूनगंड निर्माण करण्याचा प्रकार असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

The post नाशिक : मासिक पाळीमुळे वृक्षारोपणास मज्जाव, देवगाव येथील विद्यार्थिनीची तक्रार appeared first on पुढारी.