नाशिक : मासेमारीच्या नादात वृद्ध रात्रभर पूरपाण्यात

मालेगाव पूरपाणी,www.pudhari.news

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
काही दिवसांपूर्वी कमी झालेल्या पाण्याच्या प्रवाहात मासे पकडण्यासाठी गेलले वृद्ध अचानक वाढलेल्या पाण्यात अडकले. रात्रभर जीव मुठीत घेऊन बसलेल्या वृद्धाला मालेगाव मनपाच्या अग्निशमन दलाने सोमवारी (दि.25) सकाळी सुखरूप बाहेर काढले.

सध्या गिरणा नदीला पूरपाणी वाहत आहे. प्रारंभी दुथडी भरून वाहणारी नदी दोन-तीन दिवसांपासून काहीशी संथ झाली होती. त्यात रविवारी सांयकाळी मासे पकडण्यासाठी दादाजी बुधा मोरे (60) हे गेले होते. दरम्यान, चणकापूर धरणातून सात हजार क्यूसेक इतका विसर्ग वाढल्याने पाण्याची पातळी वाढली होती. त्याचा अंदाज न आल्याने मोरे अडकले होते. ते मच्छीमार आणि पट्टीचे पोहोणारे असले, तरी पाण्याचा प्रवाह अधिक आणि खडकाळ भाग असल्याने त्यांनी धाडस करणे टाळले आणि मदतीचा प्रतीक्षा केली. सोबत मोबाइल नव्हता की, कुणी दृष्टीस पडत नसल्याने ते अडकल्याचे कुणाच्याही लक्षात आले नाही. सकाळी गिरणा पुलावरून कचरा डेपोच्या दिशेला नदीत एक माणूस अडकला असल्याचे काहींना दिसले. त्यातील रतन गवळी यांनी तत्काळ अग्निशमन दलाला खबर दिली.

मुख्य अग्निशमन अधिकारी संजय पवार हे सहकार्‍यासह घटनास्थळाजवळ पोहोचले. पाण्याचा प्रवाह आणि इतर अडचणींचा अंदाज घेत त्यांनी तहसीलदार सी. आर. राजपूत यांना वस्तुस्थिती कळवली. प्रसंगी हेलिकॉप्टर अथवा इतर ‘एनडीआरएफ’कडून बोट मागविण्याच्या दिशेने चर्चा केली गेली.

तत्पूर्वी एक प्रयत्न म्हणून अग्निशमनच्या जवानांनी चाचपणी केली. फायरमन शकील अहमद मो. साबीर, विकास बोरगे, अमोल जाधव, अमोल शिंदे, किरण सूर्यवंशी, अक्षय पवार, अजय पवार यांनी लाइफ जॅकेट घेऊन त्या वृद्धापर्यंत पोहून अंतर गाठले. रात्रभर पाण्यात राहून मोरे थकले होते. त्यांना धीर देत जॅकेट घालून त्यांना जवानांनी सुखरूप बाहेर काढले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. काही दिवसांपूर्वी सूर मारलेल्या युवकाचा मृत्यू याच नदीत झाला होता.

हेही वाचा :

The post नाशिक : मासेमारीच्या नादात वृद्ध रात्रभर पूरपाण्यात appeared first on पुढारी.