नाशिक-मुंबई महामार्गाची आठवडाभरात डागडुजी करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

दादा भुसे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांची डागडुजी व दुरुस्तीची कामे आठ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. ना. भुसे यांनी शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या या बैठकीत महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, तांत्रिक प्रबंधक नितीन पाटील उपस्थित होते.

ना. भुसे म्हणाले की, नाशिक-मुंबई महामार्गावर खड्डे पडल्याने प्रवाशांना व वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे खड्डे तातडीने बुजवून वाहतुकीसाठी रस्ता सुरळीत करावा. खड्ड्यांसंदर्भात जनभावना अतिशय तीव— असून, नागरिक टोलबंदीची मागणी करत आहेत. त्यामुळे यासंदर्भात भविष्यात उद्भवणार्‍या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाची राहील, असा इशारा त्यांनी दिला.

नाशिक जिल्ह्यातून जाणार्‍या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अपघात क्षेत्रांचे सर्वेक्षण करून, त्यासाठी उपाययोजना कराव्यात. आवश्यक त्या ठिकाणी सर्व्हिस रोड, उड्डाणपूल यांचाही प्रस्ताव तातडीने करण्यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांना सूचना यावेळी त्यांनी दिल्या. नाशिक शहरातून जाणार्‍या महामार्गाचीही डागडुजी व दुरुस्ती तातडीने करण्यासंदर्भात सूचना केल्या.

नाशिक महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. ज्या अधिकार्‍यांच्या कार्यक्षेत्रात डागडुजी व दुरुस्तीची कामे पूर्ण होणार नाहीत, अशा अधिकार्‍यांवर तत्काळ प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करावी, अशा सूचना ना. भुसे यांनी मनपा आयुक्तांना केल्या. आठ दिवसांत डागडुजी व दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात पूर्णत्वास येतील, याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा  :

The post नाशिक-मुंबई महामार्गाची आठवडाभरात डागडुजी करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश appeared first on पुढारी.