Site icon

नाशिक- मुंबई महामार्गावर ३६७ हेक्टर जमीनीचे भूसंपादन

नाशिक : सतीश डोंगरे
मुंबई, पुणे, नाशिक या सुवर्ण त्रिकोणात उद्योग क्षेत्रासाठी नाशिक सर्वोत्तम ठरत असून, येथील कनेक्टीव्हीटी जमेची बाब असल्याने, औद्योगिक विकास महामंडळाने उद्योगांना नाशिक-मुंबई महामार्गावरच रेड कार्पेट टाकत घोटीजवळील आडवण, पारदेवी परिसरात तब्बल ३६७ हेक्टर भूसंपादनाची तयारी सुरू केली आहे. एमआयडीसीच्या या धोरणामुळे नव्या उद्योगांसह मुंबई, पुण्यातील उद्योगांना आपल्या प्रकल्पाच्या विस्तारासाठी चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.

सध्या नाशिकमध्ये येऊ पाहणाऱ्या उद्योगांची संख्या मोठी आहे. दररोज एमआयडीसीकडे मोठमोठ्या प्रकल्पांकडून भूखंडांसाठी विचारणा होते. सद्यस्थितीत देशातील दोन मोठे आयटी उद्योग समुह नाशिकमध्ये येण्यास उत्सुक असून, त्यांच्याकडून जागेची चाचपणी केली जात आहे. एमआयडीसीकडून माळेगाव, अक्राळे, दिंडोरी जांबूटके, राजूरबहुला, मनमाडसह घोटीचा पर्याय दिला जात आहे. त्यात नाशिक-मुंबई महामार्गावर असलेल्या घोटीचा पर्याय उद्योजकांसाठी सर्वोत्तम ठरत असल्याने, याभागात आणखी भूसंपादनाची चाचपणीही एमआयडीसीकडून केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. हा भाग दळणवळणाच्यादृष्टीने उत्तम असून मुंबई, ठाणे येथील औद्योगिक वसाहतीला कनेक्ट आहे. रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे अन् विमानसेवेसाठीही येथून कनेक्टीव्हीटी काही अंतरावर आहे. त्यामुळे उद्योजकांकडून याभागाला प्राधान्य दिले जात आहे.

नाशिकच्या मुख्य औद्योगिक वसाहती असलेल्या अंबड आणि सातपूरमध्ये नव्या उद्योगांसाठी सध्या जागाच उपलब्ध नाहीत. याचमुळे नाशिकलगत नवी जगाा संपादित करण्यात येत आहे. याशिवाय जिल्ह्यातील इतरही भागात भूसंपादनाची प्रक्रिया गतीमान असून, याठिकाणी देखील नव्या उद्योगांकडून चाचपणी सुरू आहे. विशेषत: नाशिक-मुंबई महामार्गावर आणखी कुठे भूसंपादन करता येईल याचा विचार एमआयडीसीकडून सुरू आहे.

‘सेझ’ची जागा मिळविण्याचा प्रयत्न

सिन्नर येथील इंडिया बुल्स कंपनीचे विशेष आर्थिक क्षेत्रातील (सेझ) जागा मिळविण्यासाठीही एमआयडीसीकडून पावले उचलली जात आहेत. या जागेवरील प्रस्तावित विद्युत निर्मिती प्रकल्प अद्याप कार्यान्वित होऊ न शकल्याने, ही जागा उद्योगांसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी सातत्याने मागणी होत आहे. अशात ही जागा उद्योगांसाठी उपलब्ध झाल्यास याठिकाणी मोठे प्रकल्प येऊ शकतील.

जिल्ह्यात भूसंपादनाला वेग
आडवण-पारदेवी, घोटी – ३६७ हेक्टर

जांबूटके, दिंडोरी – ३१.५१ हेक्टर
मापारवाडी, सिन्नर – २३०.६७ हेक्टर

राजूरबहुला, नाशिक – १४४.४३ हेक्टर
मनमाड – २६८.८७ हेक्टर

हेही वाचा :

The post नाशिक- मुंबई महामार्गावर ३६७ हेक्टर जमीनीचे भूसंपादन appeared first on पुढारी.

Exit mobile version