नाशिक : ‘मुक्त’च्या गुणपडताळणीसाठी आज अखेरची संधी

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे जानेवारीत घेतलेल्या परीक्षांकरिता पूनर्मूल्यांकनाची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची स्कॅनकॉपी प्राप्त करण्यासाठी सोमवारी (दि. 13) अखेरची मुदत असणार आहे, तर पूनर्मूल्यांकनासाठी 23 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली आहे. कृषी अभ्यासक्रम वगळता, अन्य प्रमाणपत्रेे, पदवी, पदविका, पदव्युत्तर या शिक्षणक्रमांच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

मुक्त विद्यापीठाने विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची स्कॅनकॉपी मिळविण्यासह पूनर्मूल्यांकनाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या विविध शिक्षणक्रमांच्या सत्र व पुरवणी परीक्षांचे निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या निकालांच्या आधारे विद्यार्थ्यांना दिलेल्या परीक्षेतील संबंधित अभ्यासक्रमास प्राप्त गुणांबाबत पडताळणी करता येणार आहे. विहीत नमुने व सूचनांचा तपशील विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आहे. दरम्यान, ऑनलाइन अर्ज करायचा असून, अर्जासोबत आवश्यक शुल्कदेखील ऑनलाइन अदा करायचे आहे. निर्धारित मुदतीनंतर ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत व कुठल्याही परिस्थितीत ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नसून, पोस्टाने अर्ज पाठवू नये, असे स्पष्ट केले आहे.

अशी आहे प्रक्रिया..
केवळ तीन विषयांसाठी गुणपडताळणी, स्कॅनकॉपी, पूनर्मूल्यांकनाचा पर्याय निवडता येणार आहे. पूनर्मूल्यांकनासाठी संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिकेची स्कॅनकॉपी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. स्कॅनकॉपीसाठी ई-मेल आयडी अचूक लिहावा. चुकीच्या ई-मेल आयडीमुळे स्कॅनकॉपी न मिळाल्यास विद्यापीठ जबाबदार राहणार नसल्याचेही परिपत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘मुक्त’च्या गुणपडताळणीसाठी आज अखेरची संधी appeared first on पुढारी.