नाशिक : मुक्त विद्यापीठाच्या पुरस्कारांचे वितरण आज

ycmou,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या बाबूराव बागूल कथा पुरस्काराचे वितरण सोमवारी (दि. १४) दुपारी 4 वाजता होणार आहे. ज्येष्ठ कथालेखक जी. के. ऐनापुरे यांच्या हस्ते व कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली २०१९ चा पुरस्कार किरण येले यांना ‘मोराची बायको’ या कथासंग्रहासाठी, तर २०२० या वर्षाचा बाबूराव बागूल कथा पुरस्कार बालाजी सुतार यांना ‘दोन शतकांच्या सांध्यावरची नोंद’ या कथासंग्रहासाठी प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांनी दिली.

ज्येष्ठ साहित्यिक बाबूराव बागूल यांच्या नावाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नवोदित कथालेखकांना त्यांच्या प्रथम कथासंग्रहासाठी पुरस्कार देते. रुपये २१ हजार, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार निवड समितीत डॉ. प्रज्ञा दया पवार, डॉ. शिरीष लांडगे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. विजया पाटील, डॉ. चंद्रकांत पाटील, प्रमोद बोरसरे आदींचा समावेश होता, असे विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्राचे प्रमुख डॉ. दयाराम पवार यांनी सांगितले.

दरम्यान, लेखक किरण येले यांच्या कथा लेखनाला समाजिकतेचे उत्तम भान आहे. त्यांच्या कथा स्वत:ची वेगळी वैशिष्ट्ये घेऊन येतात. बालाजी सुतार हे आजच्या पिढीतले महत्त्वाचे लेखक असून, त्यांच्या पहिल्याच कथासंग्रहातून मराठी लघुकथेला एक नाव आयाम दिल्याचे कुलसचिव पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

The post नाशिक : मुक्त विद्यापीठाच्या पुरस्कारांचे वितरण आज appeared first on पुढारी.