Site icon

नाशिक : मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून ‘बापूजींच्या गोड गोष्टी’चे सादरीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सत्य आणि अहिंसेचे तत्त्व हे निरागसतेच्या पायावर भक्कम उभे असते. ही निरागसता, नितळपणा गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाची खास वैशिष्ट्ये होती. याच वैशिष्ट्यांचे आरसपाणी दर्शन घडविणारा सानेगुरुजी लिखित ‘गोष्टीरूप गांधीजी’ या ग्रंथावर आधारित ‘बापूजींच्या गोड गोष्टी’ हा नाट्यमय अभिवाचनाचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या महात्मा गांधी अध्यासनातर्फे विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केला.

या अभिवाचनाचे सादरीकरण वीणा शिखरे, श्रद्धा पाटील, महेंद्र शहाणे, विनय शुक्ल, कल्पना सोनार या नाट्यशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी केले. नाट्यरूपांतर श्रीराम वाघमारे यांनी तर दिग्दर्शन चंद्रवदन दीक्षित यांनी केले. संगीताची बाजू सुरेश गंगाराम यांनी सांभाळली. महात्मा गांधीजींच्या आयुष्यातील छोट्या छोट्या घटनादेखील मानवी जगण्याला दिशा देत राहतात. त्यामुळे आपला देश हा विश्वात गांधीजींचा आणि बुद्धाचा देश म्हणून ओळखला जातो, असे प्रतिपादन यावेळी निरंतर विद्याशाखेचे संचालक तथा महात्मा गांधी अध्यासनप्रमुख डॉ. जयदीप निकम यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख होते. विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र पदविकाधारक विद्यार्थ्यांना गुणपत्रकवाटप करण्यात आले. नाट्यशास्त्र विभागाची पहिलीच बॅच यशस्वीपणे पदविका मिळवून बाहेर पडत असल्याबद्दल डॉ. देशमुख यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाट्यशास्त्र विभागाचे सहयोगी सल्लागार सचिन शिंदे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या वतीने दीपक अकोटकर, दीपाली तंबाखे सोसे, आनंद बिरादार या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

हेही वाचा:

The post नाशिक : मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून ‘बापूजींच्या गोड गोष्टी’चे सादरीकरण appeared first on पुढारी.

Exit mobile version