नाशिक : मुलांसाठी पाणी घ्यायला खाली उतरली, गाडी सुटली अन्…

नाशिक,www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा; रेल्वेगाडीत राहिलेल्या दोन लहान भाऊ आणि बाळाशी उत्तर प्रदेशातील महिलेची काल रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या तत्परतेमुळे परत भेट झाली. ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत हे शक्य झाले.

नाशिकरोड रेल्वे स्थानकातील रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयाला सायंकाळी देवळाली स्थानकावरील उपव्यवस्थापक अनिल सागर यांनी फोनवरून माहिती दिली की, उत्तर प्रदेशातील गंगा विक्रम बसफोर (वय 19) या महिलेचे दोन अल्पवयीन भाऊ पवन (12 वर्ष) आणि राजेश (8 वर्षे) तसेच नवजात बालक रेल्वे क्रमांक 13202 मध्ये राहिले आहे. ही महिला देवळाली स्थानकात पिण्याचे पाणी आणण्यासाठी उतरली असता अचानक गाडी सुरू झाल्यामुळे तिचे भाऊ आणि बाळ गाडीमध्येच राहिले. अनिल सागर यांनी नाशिकरोड रेल्वे सुरक्षा दलाच्या शोभा मोटे यांच्याशी संपर्क साधून मुलांचा शोध घेण्याची सूचना केली.

नाशिकरोडला गाडी आल्यावर शोभा मोटे आणि हेडकॉन्स्टेबल समाधान गांगुर्डे गाडीत गेले. नवजात अर्भक आणि अल्पवयीन दोन भावांना सुखरूपपणे गाडीतून खाली उतरवले. आरपीएफ पोलीस ठाण्यात आणले. देवळाली स्थानकात कळविल्यावर ही महिला नाशिकरोडला आली. बाळ आणि भावांची भेट होताच तीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. पंचासमोर या तीघांना महिलेच्या ताब्यात देण्यात आले. रेल्वेसुरक्षा दल आणि पोलिसांचे तिने आभार मानले.

हेही वाचा :

The post नाशिक : मुलांसाठी पाणी घ्यायला खाली उतरली, गाडी सुटली अन्... appeared first on पुढारी.