Site icon

नाशिक : …म्हणून सुपारी फोडायच्या कार्यक्रमातच उरकवलं लग्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
विवाहसोहळा म्हटला की, डोंगराएवढा लाखो रुपयांचा खर्च, नातेवाईक अन् वऱ्हाडी मंडळींचा मानपान, पाहूण्यांची मर्जी अशा अनेक गोष्टी येतात. त्यातच हा सोहळा जर शेतकऱ्याच्या घरचा असेल तर दोन्हीकडे मोठा मानपान! सध्याच्या बेभरवश्याच्या वातावरणात पीकांना भाव नसल्याने आधीच शेतकरी मेटाकुटीला आला असताना हा खर्च म्हणजे मोठाच भार. लग्नसोहळ्यातील दिखाऊ प्रतिष्ठा टाळण्यासाठी मुलगी बघून कार्यक्रमाची सुपारी फोडायच्या कार्यक्रमातच (साखरपुड्यात) दोन्ही कुटूंबांनी लग्नाचा बार उडवून चांगला पायंडा पाडला.

देवळा तालुक्यातील उमराणे येथील कैलास देवरे आणि नाशिकरोड येथील ज्ञानेश्वर परशराम भोर यांच्या कुटूंबाची ही गोष्ट. भोर यांची कन्या निकिताला वरण्याकरिता सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमास देवरे कुटूंब उपस्थित झाले. दोन्ही मंडळी शेतकरी कुटुंबातील असल्याने वधू आणि वर पक्षामध्ये विवाह सोहळ्यावर चर्चा झाली. यामध्ये वाढती महागाई, वेळेचा अपव्यय, वारंवार येणारे अस्मानी संकट आणि विवाहसोहळ्यात होणारा अवास्तव खर्च, नातेवाईक अन् समोरील पक्षाचा मानपान, जेवणाचा खर्च अन् त्यात अर्धे वाया जाणारे अन्न आदी गोष्टींवर चर्चा झाली. त्यानुसार दोन्ही पक्षाने आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आढेवेढे न घेता, वाढीव खर्चाला फाटा देत सुपारीच्या कार्यक्रमातच विवाहसोहळा पार पाडण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे महिलादिनी बुधवारी (दि. ८) निकिताचा विवाह आनंदाने पार पडल्याने उपस्थितांनी शुभाशीर्वाद देत अक्षता टाकल्या आणि एका अनोख्या मंगलकार्याला आणखी शूभकार्याची अक्षत झालर लावली.

हेही वाचा :

The post नाशिक : ...म्हणून सुपारी फोडायच्या कार्यक्रमातच उरकवलं लग्न appeared first on पुढारी.

Exit mobile version