Site icon

नाशिक : म्हणे श्वानाला दगड मारला… कारची काच फुटली, मग काय नशेत सात वाहनांच्या काचा फोडल्या

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा

‘रात्री घरी जाताना श्वान मागे लागले, त्याला दगड मारला. तो दगड श्वानाला न लागता कारला लागून कारची काच फुटली. मग मी तिथे उभ्या असलेल्या सर्वच कारच्या काचा फोडल्या’, ही कबुली आहे. सातपूर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास सात कारच्या काचा फोडून खळबळ उडवून देणाऱ्या संशयिताची. ज्या घटनेने संपूर्ण सातपूरमध्ये खळबळ उडवून दिली, त्या घटनेतील संशयिताला गुन्हे शाखा युनिट दोनने काही तासांतच बेड्या ठाेकल्या. परंतु, त्यात त्याने दिलेल्या कबुलीने पोलिसही चक्रावून गेले. विशेष म्हणजे इतरांच्या वाहनांचे अशाप्रकारे नुकसान केल्याचा जराही पश्चात्ताप त्याला झाल्याचे जाणवले नाही.

सातपूर कॉलनी परिसरात रात्री एकाच वेळी सात चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने काचा फोडणाऱ्या संशयिताला पकडले आहे. आकाश निवृत्ती जगताप (२१, रा. एमएचबी कॉलनी) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला ताब्यात घेऊन सातपूर पोलिसांनी दुपारी सातपूर कॉलनीतील जिजामाता शाळा ते शिवनेरी गार्डनपर्यंत धिंड काढली. मंगळवारी (दि. १७) मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने एमएचबी कॉलनी परिसरातील सात कारच्या काचा फोडल्याची बाब उघडकीस आली होती. या घटनेने स्थानिकांनी नाराजी व्यक्त करीत तोडफोड करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर व गुन्हे शाखा पोलिस दगडफेक करणाऱ्याचा शोध घेत होते. गुन्हे शाखा युनिट दोनचे अंमलदार राजेंद्र घुमरे व संजय सानप यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून आकाश जगतापला पकडले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याचा ताबा सातपूर पोलिसांकडे देण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, उपनिरीक्षक पोपट कारवाळ, सहायक उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, राजेंद्र घुमरे, सुनील आहेर, प्रशांत वालझाडे, संतोष ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सातपूर कॉलनी परिसरातील नागरिकांनी सातपूर पोलिसांसह माजी नगरसेवक सलीम शेख यांच्या पाठपुराव्याचे कौतुक केले. पोलिसांनी संशयिताची वरात काढत नागरिकांना दिलासा दिला. सातपूरचे पोलिस निरीक्षक सतीश घोटेकर, उपनिरीक्षक बाळासाहब वाघ, पोलिस हवालदार दीपक खरपडे, गोकुळ कासार, सागर गुंजाळ, संभाजी जाधव आदी पोलिस यावेळी सहभागी होते.

हेही वाचा :

The post नाशिक : म्हणे श्वानाला दगड मारला... कारची काच फुटली, मग काय नशेत सात वाहनांच्या काचा फोडल्या appeared first on पुढारी.

Exit mobile version