
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील म्हाळोबा मंदिर परिसरात भगत मंडळींकडून सुरू असलेल्या भोंदूगिरीबाबत स्थानिकांनी केलेल्या तक्रारीनंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी जाऊन महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायद्यातील तरतुदी समजावून सांगितल्या आहेत. यानंतर परिसरात भोंदूबाबांनी भोंदूगिरी करून शोषण करण्याचा प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी वावी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस आर. टी. तांदळकर उपस्थित होते.
दोडी बुद्रुक येथील म्हाळोबा देवस्थान हे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथे राज्यभरातून भाविक येत असतात. मात्र, वाढत्या गर्दीनंतर काही भगत मंडळींनी भोंदूगिरी सुरू केली असून, त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण करण्याचे प्रकार घडतात. काही भोंदूबुवा महिलांच्या बाबतीमध्ये गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करतात, अशी लेखी तक्रार महाराष्ट्र अंनिसच्या नाशिक जिल्हा शाखेला प्राप्त झाली. त्यानुसार कार्यकर्त्यांनी वावी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सागर कोते आणि त्यांचे सहायक पोलिस निरीक्षक आर. टी. तांदळकर यांच्याशी तातडीने संपर्क करून, संबंधित भगत मंडळी, दोडी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, काही प्रतिष्ठित ग्रामस्थ यांची अंनिसच्या वतीने संयुक्त बैठक मंगळवारी (दि.2) म्हाळोबा मंदिरात झाली. भगत भिकाजी शिंदे, भारत बिरुजी शिंदे, पाराजी गबाजी शिंदे, बापू नामदेव शिंदे, कारभारी भगत शिंदे, मारुती गणपत शिंदे, मनोहर कारभारी माळी, रतन लक्ष्मण शिंदे, सुखदेव महादू साबळे, सहायक पोलिस निरीक्षक आर. टी. तांदळकर आणि महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे, राजेंद्र फेगडे आणि सिन्नर शाखेचे अध्यक्ष डॉ. श्यामसुंदर झळके सहभागी झाले होते.
तर त्यांच्यावर कडक कारवाई करणार…
या बैठकीत जमलेल्या भगत मंडळींनी तेथे काय काय गैरप्रकार चालतात, हे पुन्हा पोलिस अधिकारी, ग्रामपंचायत सदस्यांच्या समोर कथन केले. बैठकीत संबंधित भगत मंडळी यांनीच पुढाकार घेऊन, ज्या व्यक्ती भोंदूगिरी करतात, त्यांना समजावून सांगावे आणि असे अघोरी गैरप्रकार थांबवण्याचे आवाहन करावे, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. देवाला नवसपूर्ती म्हणून यापुढे उघड्यावर पशूबळी देण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे तांदळकर यांनी बजावले.
अंनिसचे पोलिसांना निवेदन …
मंदिर किंवा मंदिराच्या परिसरात चालणारी भोंदूगिरी तत्काळ थांबवावी अन्यथा पोलिस अशा भोंदूंचा शोध घेऊन, जादूटोणाविरोधी कायदा आणि तत्सम कायद्यान्वये संबंधितावर कायदेशीर गुन्हे दाखल करतील, असेही तांदळकर यांनी स्पष्ट केले. मंदिर आणि परिसरातील भोंदूगिरी तत्काळ थांबवण्याबाबत महाराष्ट्र अंनिसच्या वतीने तेथेच सहायक पोलिस निरीक्षक तांदळकर यांना निवेदन देण्यात आले..
हेही वाचा:
- नाशिक : कुटुंबाने साजरा केला मुलीचा प्रथम मासिक पाळी महोत्सव, राज्यभर होतेय चर्चा
- मालेगावात पुन्हा गोळीबार ; धाक दाखवून व्यापार्याला लुटण्याचा प्रयत्न
- इंदूरच्या तरुणाने शोधले ‘अँड्रॉईड 13’मधील 49 बग!
The post नाशिक : म्हाळोबा मंदिरातील भोंदूगिरीविरोधात कारवाई; महाराष्ट्र अंनिस व पोलिसांचा बैठकीत इशारा appeared first on पुढारी.