नाशिक : यंदा पक्षीदर्शन सुलभ; विदेशी पाहुण्यांचे आगमन सुरू

पक्षी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर तसेच रामसरचा दर्जा मिळालेल्या नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या जलाशयातील टायफा गवत काही महिन्यांपूर्वी काढण्यात आल्याने यंदा पर्यटकांना पक्षीदर्शन सुलभ होणार असल्याचा दावा वन्यजीव विभागाकडून करण्यात आला आहे. अभयारण्यातील जलाशयाच्या किनार्‍यावर उभे राहून अर्थात अगदी जवळून पक्षी बघण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. त्यातच विदेशी पाहुण्यांचे आगमन सुरू झाल्याने अभयारण्यातील पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे.

पक्षितीर्थ अर्थात नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात हिवाळ्यात देश-विदेशातील हजारो पक्षी दरवर्षी मुक्कामी येतात. विशेषत: सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यांमध्ये फ्लेमिंगोसह विविध प्रजातींचे पक्षी हे या ठिकाणी वास्तव्यास असतात. नांदूरमध्यमेश्वर जलाशय पाणथळ असल्याने देशी-विदेशी पक्ष्यांची संख्या लक्षणीय असते. देशी-विदेशी स्थलांतरित पक्षी बघण्यासाठी वन्यजीव अभ्यासकांसह पर्यटकही आतुर असतात. मात्र, यंदा पावसाळा लांबल्याने विदेशी पाहुण्यांचे आगमनही लांबणीवर पडले होते. आता थंडीचा जोर वाढू लागल्याने स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली. नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात मागील काही दिवसांपासून हळदी-कुंकू बदक, जांभळी पाणकोंबडी, पिनटेल, टफ्टेड, पोचार्ड, राखी बगळा, जांभळा बगळा, तुतवार, थापट्या, गढवाल, ग्रेट स्पॉटेल ईगल, मार्श हॅरियर, पाणकावळे, रंगीत करकोचा, ग्लॉसी आयबिस, उघड्या चोचीचा करकोचा, चमचा, किंगफिशर, हुदहुद, बीईटर आदी पक्ष्यांचे दर्शन होत असल्याने पर्यटकांची गर्दी बघावयास मिळते. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या अर्थचक्राला गती मिळत आहे. तर प्रवेशशुल्काच्या माध्यमातून वन्यजीव विभागाला यंदा भरघोस उत्पन्न मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

७,००० पक्ष्यांची प्रगणनेत नोंद
पक्षी सप्ताहानिमित्त दोन दिवसांपूर्वी नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य क्षेत्रातील चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी, मधमेश्वर गोदावरी पात्र, कोठुरे, कुरूडगाव, काथरगाव आदी सात केंद्रांवर पक्षी निरीक्षण करण्यात आले. या पक्षी प्रगणनेत सुमारे सात हजार पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये विविध प्रजातींचे पाणपक्षी तसेच झाडांवरील व गवताळ पक्ष्यांचा समावेश आहे. काही विदेशी पाहुण्यांची नोंद प्रगणनेत करण्यात आली आहे.

नांदूरमध्यमेश्वरला येणारे विदेशी पाहुणे…

फ्लेमिंगो – भारत-पाक सीमेवरील कच्छ आखात
सामान्य क्रौंच – सायबेरिया व मध्य आशिया
करकरा क्रौंच – मंगोलिया व मध्य आशिया
युरेशियन कोरल – मध्य युरोप व पश्चिम आशिया
तलवार बदक – रशिया व मध्य आशिया
बाकचोच तुतारी -उत्तर आशिया
चिखली तुतारी – युरोप
थापट्या बदक – युरोप व आशिया
गोरली (सुलोही) – बलुचिस्तान
ब्लिथरचा बोरू – पाकिस्तान
हिरवट वटवट्या – पाकिस्तान
करड्या मानेचा भारीट – बलुचिस्तान

हेही वाचा:

The post नाशिक : यंदा पक्षीदर्शन सुलभ; विदेशी पाहुण्यांचे आगमन सुरू appeared first on पुढारी.