Site icon

नाशिक : यशवंतराव होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आज दमदार स्वागत

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
छत्रपती यशवंतराव होळकर यांचा भव्यदिव्य अश्वारूढ पुतळ्याची स्थापना इंदूरला करण्यात येणार आहे. हा अश्वारूढ पुतळा पुणे येथे बनवण्यात आला आहे. या पुतळ्याचे बुधवार (दि. 10) नाशिक जिल्ह्यात आगमन होणार आहे. या भव्यदिव्य अश्वारूढ पुतळ्याचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती मल्हार सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मच्छिंद्र बिडगर यांनी दिली.

इंग्रजांना सलग 18 वेळा पराजित करणारे महाराज यशवंतराव होळकरांचा अश्वारूढ पुतळा पुणे येथे बनवण्यात आला आहे. या पुतळ्याची स्थापना मध्य प्रदेशातील इंदूरनगरीत होणार आहे. हा पुतळा शिरूर, अहमदनगर, शिर्डीमार्गे जिल्ह्यातील येवला, अनकाई, मनमाड, दहेगाव, कुंदलगाव, कानडगाव, चौढी, जळगाव, मालेगाव, झोडगेमार्गे धुळे असा पुढे इंदूरकडे बुधवार (दि.10) रवाना होणार आहे. या शौर्ययात्रेचे स्वागत त्या-त्या परिसरातील समाजबांधव ढोलताशे, लेजीम, फुगडी, रांगोळी काढून करणार आहेत. यावेळी खोबरे व भंडार्‍याची उधळण, तसेच ठिकठिकाणी मेंढ्यांचे रिंगण देऊन धनगरी वेशभूषा परिधान केली जाणार आहे. इंदूरला पुतळ्याची स्थापना करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणची माती संकलित केली गेली आहे. यासाठी लासलगाव येथील होळकर वाड्याची माती, तुकोजी होळकरांचे जन्मगाव करंजी येथील माती, निफाड येथील फणसेवाडा व चांदवड येथील अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेल्या ऐतिहासिक रंगमहाल येथील माती धनगर समाजबांधवांनी संकलित करत पुतळ्यासोबत पाठवली जाणार आहे. पुतळ्याच्या स्वागतासाठी जिल्हाभरातील समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मल्हार सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मच्छिंद्र बिडगर यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : यशवंतराव होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आज दमदार स्वागत appeared first on पुढारी.

Exit mobile version