
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
फायर ऑडिट करून न घेणाऱ्या शहरातील जवळपास चारशे खासगी रुग्णालयांचा पाणी व वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असून, तशी कार्यवाही मनपाच्या अग्निशमन विभागाने हाती घेतली आहे. अग्निशमन विभागाकडून यासंदर्भात पाणीपुरवठा विभागासह महावितरणला पत्र सादर केले जाणार आहे. त्यानुसार दि. १ मार्चपासून कारवाईला सुरुवात होणार असल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांनी सांगितले.
मनपा हद्दीत असलेल्या शासकीय, निमशासकीय कार्यालये, हॉटेल्स, शैक्षणिक इमारती, रुग्णालये, व्यावसायिक, औद्योगिक तसेच १५ मीटरपेक्षा अधिक उंच रहिवासी इमारतींना फायर ऑडिट करणे कायद्यानुसार बंधनकारक केले आहे. अंतिम फायर ऑडिट करून उपाययोजनांचा दाखला सादर करण्याकरता मनपा अग्निशमन विभागाने सर्व इमारत मालक तसेच भोगवटादारांना १५ फेब्रुवारीचा अल्टीमेटम दिला होता. या अल्टीमेटमनंतरही फायर ऑडिट करून न घेणाऱ्या इमारतींची पाणीपुरवठा तसेच वीजपुरवठ्याची सुविधा खंडित केली जाणार आहे. तसेच अशा संबंधित इमारती पोलिसांमार्फत सील करण्याचा इशारा अग्निशमन विभागाने दिला आहे.
राज्यात ६ डिसेंबर २००८ पासून महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम लागू करण्यात आले आहे. या अधिनियमातील कलमानुसार नाशिक महापालिका क्षेत्रातील विविध आस्थापनांच्या इमारती आणि १५ मीटरपेक्षा उंच रहिवासी इमारतींना फायर ऑडिट बंधनकारक केले आहे. संबंधित इमारतींना अग्निप्रतिबंधक उपाययोजना तसेच दुरुस्ती व कार्यक्षम असल्याबाबतचे फायर ऑडिट प्रमाणपत्र वर्षातून दोन वेळा जानेवारी आणि जुलै महिन्यात मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक आहे. असे असताना अनेक मालमत्ताधारक तसेच इमारतींचे मालक फायर ऑडिट करून घेत नाहीत. दिलेल्या मुदतीत मनपा हद्दीतील ६४७ रुग्णालयांपैकी केवळ २४६ रुग्णालयांनी फायर ऑडिट करून घेतले असून, चारशे रुग्णालये अद्याप बाकी आहेत.
तर सश्रम कारावासाची शिक्षा
फायर ऑडिट नियमांचे उल्लंघन करत रुग्णांचा जीव धोक्यात घालणाऱ्या खासगी रुग्णालयांच्या इमारतींचा पाणी व वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर संबंधित मालमत्ताधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यानंतरही फायर ऑडिटची पूर्तता न केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा संजय बैरागी यांनी दिला आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत सश्रम कारावास व २० ते ५० हजारांपर्यंत दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.
शहरातील रुग्णालयांच्या फायर ऑडिटची स्थिती
विभाग – एकूण रुग्णालये फायर ऑडिट केलेली फायर ऑडिट नसलेली
पूर्व+पश्चिम – २२६ १०२ १२४
सातपूर – ४७ १९ २८
नाशिकरोड – ९२ ४३ ४९
सिडको – १५१ ४८ १०३
पंचवटी – १२८ ३४ ९४.
हेही वाचा :
- काजूचे दूध ठरते आरोग्यदायी!
- पुणे : धार्मिक संस्थांकडून सोशल मीडियाचा सकारात्मक वापर
- पुणे : वीर संताजी घोरपडे मार्ग पार्किंगच्या विळख्यात
The post नाशिक : 'या' कारणामुळे 400 रुग्णालयांचा पाणी, वीजपुरवठा होणार खंडित appeared first on पुढारी.