नाशिक : युवकाच्या खून प्रकरणी अंबड पोलिसांकडून तिघांना अटक

अटक

नाशिक(सिडको) : पुढारी वृत्तसेवा

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत महालक्ष्मीनगर परिसरातील हनुमान मंदिर चौकात मयूर दातीर याचा खुन करून फरार झालेल्या तिघांनाही दहा तासाच्या आत अंबड पोलिसांनी रात्री त्र्यंबकेश्वर जवळील पाड्यावरून ताब्यात घेऊन अटक केली आहे .

या बाबत पोलिसांनी सांगितले की, मयूर केशव दातीर (वय २०, रा. महालक्ष्मीनगर अंबड) हा महालक्ष्मीनगर परिसरातील हनुमान मंदिर चौकात गुरुवारी अडीच वाजेच्या सुमारास मित्र अरुण वैरागर याच्या सह दुचाकी वर आला. त्यानंतर त्या ठिकाणी सराईत गुन्हेगार संशयित करण कडुस्कर (वय २३) रा अंबड,  मुकेश मगर (वय २४ ) रा .अंबड, रवि आहेर (वय २२) रा. अंबड हे तिघे दुचाकीवर मंदिर चौकात आले. या नंतर करण याने मयत मयूर कडे दारू साठी पैसे मागीतले. मात्र त्यावरुन त्याच्यांत वाद झाला.  या नंतर करण याने धारदार शस्त्राने मयुर याच्या छाती व पोटावर सहा वार केले. यात मयुरच्या पोटातील आतडे बाहेर आल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे जागेवरच त्याचा मृत्यू झाला. यावेळी करण कडुस्कर याने मध्ये कोणी पडल्यास मारून टाकेल असा दम देऊन संशयित करण कडुस्कर, मुकेश मगर, रवि आहेर हे दुचाकी वरुन फरार झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, सहायक पोलिस आयुक्त आनंदा वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, मनोहर कारंडे सह पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला. आरोपीच्या शोधार्थ सहा पथके विविध ठिकाणी रवाना केले. अंबड पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक नाईद शेख यांच्या नेतृत्वाखाली पथकाने त्रिबंकेश्वर जवळील पाड्यावर मध्यरात्री जाऊन एका घरातून करण कडुस्कर, मुकेश मगर, रवि आहेर या तिघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. या तिघांनी खुन केल्यानंतर पहिने येथे गेले, तेथे जेवण करून ते त्रिंबकेश्वर जवळील पाड्यावर गेले होते. पोलिसांनी शोध लावून त्यांना ताब्यात घेतले.

The post नाशिक : युवकाच्या खून प्रकरणी अंबड पोलिसांकडून तिघांना अटक appeared first on पुढारी.