Site icon

नाशिक : येथील ग्रामीण रुग्णालयाचा रस्ताच व्हेंटिलेटरवर, प्रशासनाचे दुर्लक्ष

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
ग्रामीण रुग्णालयाकडे जाणार्‍या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. लासलगाव नवीन बाजार समितीशेजारील ग्रामीण रुग्णालयाकडे जाणार्‍या रस्त्यांवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांकडे बांधकाम विभागाच्या वतीने साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे हे खड्डे आता रुग्णांच्या जिवावर उठले आहेत अशा भावना व्यक्त होत आहेत.

येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने नागरिक उपचारासाठी येत असतात. मात्र, अनेक महिन्यांपासून येथील वर्दळीच्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयाकडे रात्रीच्या वेळी उपचारासाठी जाणार्‍या नागरिकांना पथदीप नसल्याने अंधारामध्ये प्रवास करावा लागतो. या रस्त्यालगत दिवाबत्तीची व्यवस्था करण्याची मागणी अनेक महिन्यांपासून नागरिक करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रुग्णांची हेळसांड होत असून हा रस्ता जणू शेवटच्या घटका मोजत आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमधून वाहन उसळून अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. रस्त्याने जाणार्‍या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची चाके या खड्ड्यांत आदळून वाहनांचा खुळखुळा होत आहे. सोबतच वाहनावर बसलेल्यांनाही पाठीच्या दुखण्यांना सामोरे जावे लागत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याची वाट लागलेली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यालगत लाइट नसल्याने रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात जाण्यास मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन बांधकाम विभागाने हा रस्ता वापरण्यायोग्य करावा. -दिलीप सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते, लासलगाव.

हेही वाचा:

The post नाशिक : येथील ग्रामीण रुग्णालयाचा रस्ताच व्हेंटिलेटरवर, प्रशासनाचे दुर्लक्ष appeared first on पुढारी.

Exit mobile version