
नगरसूल (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
येवला तालुक्यातील राजापूर-ममदापूर राखीव वन संवर्धन क्षेत्रामध्ये रखरखत्या उन्हात पिवळा व लाल पळस फुलला आहे. डोंगराळ भागातील राजापूर-ममदापूर राखीव संवर्धन प्रकल्पात अनेक पशू-पक्ष्यांचा वावर आहे. हरिण-काळवीट हे तर नेहमीच नजरेस पडतात.

एरवी माघ व फाल्गुन म्हणजेच फेब्रुवारी-मार्च महिन्यात जिकडे-तिकडे वाळलेले गवत पाहावयास मिळते, पण माळरानावर पळसाच्या झाडांना पिवळ्या रंगाची फुले असल्याने हा परिसर आनंददायक झाला आहे. या क्षेत्रातील पळस पिवळा व लाल असून दोन्ही पळस पाहण्यास मिळत आहेत. बरेच लोक या पळसाच्या झाडाचे फोटो, सेल्फीचा आनंद घेतात. माणसाप्रमाणे वन्य प्राणीही उन्हाळ्यात बहरलेल्या या लाल पळसाच्या झाडाजवळ बागडून आनंद घेत आहेत.
सध्या जिकडे-तिकडे वाळलेले गवत असून त्यावर हरिण-काळवीट आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. राजापूर-वडपाटी पाझर तलावाच्या बाजूने हरिण काळवीट यांच्यासाठी गवताच्या लागवडीयोग्य क्षेत्र झाल्याने काही प्रमाणात त्यांची भटकंती थांबली आहे. तसेच वन संवर्धन राखीवमध्ये हरिण काळवीट यांच्यासाठी वन विभागाने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. बऱ्याच ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केलेले आहेत व त्यात आता टँकरने पाणी टाकून मुक्या प्राण्यांना उन्हाळ्यात तळपत्या उन्हात पाणी उपलब्ध आहे.
हेही वाचा :
- मूल मोठे झाल्यावर ‘ताबा’ घेण्याबाबत विभक्त पालकांची मागणी महत्त्वाची ठरत नाही : केरळ उच्च न्यायालय
- खेडचा दुर्गम भाग ताप, सर्दी, खोकल्याने बेजार
- शिवजयंती : डोळ्याचे पारणे फेडणारा महाराजांचा हा पुतळा कुठे आणि किती फुटांचा?
The post नाशिक : रखरखत्या उन्हात फुलला लाल-पिवळा पळस! appeared first on पुढारी.