नाशिक : रद्दी घेऊन जाणाऱ्या आयशरला आग लागून लाखोंचे नुकसान; वडाळीभोई येथील घटना

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : चांदवड तालुक्यातील वडाळीभोई शिवारातील मुंबई आग्रा महामार्गाने रद्दी घेऊन जाणाऱ्या आयशरच्या मशीनमध्ये शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागली. या आगीने बघता बघता रौद्ररूप धारण केल्याने आगीत संपूर्ण आयशर जळून खाक झाला. पर्यायाने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

नाशिक येथून रद्दीने भरलेला आयशर (एम एच ०४, एल एल ९०५५) शुक्रवारी (दि.४) मुंबई आग्रा महामार्गांने सटाणा येथे जात होता. रात्री ८ वाजून २८ मिनिटांच्या सुमारास गाडी चांदवड तालुक्यातील वडाळीभोई शिवारातून जात असताना शॉर्टसर्किट होऊन गाडीला आग लागली. मशीन मधून धूर येत असल्याचे पाहून गाडी चालकाने महामार्गाच्या कडेला गाडी उभी केली. यावेळी आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीने आयशर गाडीला वेढाच घातला होता. ही आग विझवण्यासाठी सोमा टोल वेज कंपनीचे आपत्कालीन पथक व अग्निशमन दल घटनास्थळी पोहचल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यावेळी आग पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

अधिक वाचा :

The post नाशिक : रद्दी घेऊन जाणाऱ्या आयशरला आग लागून लाखोंचे नुकसान; वडाळीभोई येथील घटना appeared first on पुढारी.