नाशिक : रब्बीसाठी कडवाचे आज संक्रांतीपासून 30 दिवसांचे आवर्तन

कडवा धरण www.pudhari.news

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
कडवा व भोजापूर कालव्यातून यंदा रब्बीचे आवर्तन रविवारी (दि. 15) म्हणजेच संक्रांतीच्या दिवशी सुटणार असल्याने खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांचा सण असलेल्या मकरसंक्रांतीची गोडी वाढणार आहे. कडवा कालव्यास रब्बीसोबत बिगरसिंचनाचेही आवर्तन सोडण्याच्या सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिल्याने सिंचनासाठी 30, तर बिगरसिंचनासाठी 4 दिवसांचे, तर भोजापूरमधून 15 ते 20 दिवसांचे सिंचनाचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. कालव्यास तातडीने आवर्तन सोडावे, अशी मागणी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनीही पाटबंधारे विभाग नाशिकचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली होती.

सिन्नरच्या पूर्व भागातील ठराविक गावांतील शेतकर्‍यांनीच पाणी मागणी केली असून, आवर्तन सुटल्यावर काही प्रमाणात पाण्याची मागणी वाढेल, असा अंदाज आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण खूपच कमी होते. त्यामुळे सुमारे दीड हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाण्याची मागणी झाली होती. शिवाय पाण्याच्या चोरीसाठी कालवा सतत फोडला जात असल्याने आवर्तनाचे नियोजन सुरुवातीला कोलमडले होते. त्यातून सुमारे 600 हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित राहिले होते. यंदा मात्र 10 ते 12 दिवसांत शेवटचे गाव पुतळेवाडीपर्यंत आवर्तन पोहोचेल, असा अंदाज आहे. कडवा धरणात 1600 एमसीएफटी जलसाठा आहे. त्यातून 902 एमसीएफटी सिंचनासाठी राखीव आहे. एवढे पाणी 30 दिवसांच्या आवर्तनात 350 क्यूसेक क्षमतेने सोडले जाणार आहे. उर्वरित 4 दिवसांत 128 एमसीएफटी पाणी बिगरसिंचनासाठी म्हणजे पिण्यासाठी सोडले जाणार आहे.

रब्बीसाठी सोडण्यात येणार्‍या कडवा व भोजापूर आवर्तनात सिंचनाचा लाभ घेण्यासाठी लाभधारक पाणी मागणी अर्ज भरावेत. –   सागर शिंदे, जलसंपदा अधीक्षक.

यंदा पाऊस सर्वत्र झालेला आहे, त्यामुळे पाणी मागणी साहजिकच कमी आहे, मात्र सिन्नरच्या पूर्व भागात काही गावांतून पाणी मागणी आली आहे. आवर्तनाचा लाभ सर्वांना मिळणार आहे. शेतकर्‍यांनी आपसात सामोपचाराने एकमेकाला सहकार्य केल्यास पाणी वितरण करण्यास अडचणी येणार नाही. – माणिकराव कोकाटे, आमदार सिन्नर.

सिन्नर व निफाड तालुक्यांतील भागातील लाभधारक शेतकर्‍यांची आवर्तन सोडण्यासाठी मागणी होती. तसेच सिन्नरच्या पूर्व भागातील मिठसागरे, पंचाळे प्रादेशिक पाणीपुरवठा भाग व अंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या तलावांमध्ये कालव्याद्वारे पाणी आवर्तन सोडल्यास विहिरींना पाझर येऊन ग्रामस्थांचा व पशुधनाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. – राजाभाऊ वाजे, माजी आमदार, सिन्नर.

हेही वाचा:

The post नाशिक : रब्बीसाठी कडवाचे आज संक्रांतीपासून 30 दिवसांचे आवर्तन appeared first on पुढारी.