नाशिक : रस्त्याचे निकृष्ट काम करणारे ठेकेदार ब्लॅकलिस्टमध्ये जाणार

खड्डे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील नव्या-जुन्या दोन्ही रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडल्याने वाहनधारकांसह नागरिकांना अनेक गैरसोयींना सामाेरे जावे लागत असून, मोठ्या प्रमाणावर तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारींची आयुक्तांनी दखल घेत शनिवारी (दि.२०) झालेल्या बैठकीत बांधकाम आणि गुणवत्ता विभागाला धारेवर धरत कानउघाडणी केली. तसेच निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

गेल्या तीन वर्षांत शहरातील रस्त्यांवर सुमारे साडेसहाशे कोटींचा खर्च झाला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. पाच-सहा महिन्यांपूर्वी डांबरीकरणाची नवीन कामे झालेल्या रस्त्यांवरही खड्डे पडल्याने तसेच डांबर वाहून गेल्याने मनपाच्या सार्वजनिक बांधकाम आणि गुणवत्ता विभागाने नेमके काय केले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तीन वर्षांत बनविलेल्या डिफेक्ट लायबिलिटीमधील रस्त्यांवरही खड्डे पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ठेकेदारांचा कारभार झाकण्यासाठी बांधकाम विभागाकडून मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. परंतु, या विभागाने संबंधित ठेकेदारांवर काेणत्याही स्वरूपाची ठोस कारवाई केली नाही. यामुळे रस्त्यांच्या कामात अभियंते आणि ठेकेदारांची मिलिजुली समोर आली आहे. रस्त्यांची कामे सुरू असताना त्यावर गुणवत्ता विभागाचे नियंत्रण असते. परंतु, या विभागाकडूनही योग्य ती दखल घेतली न गेल्यानेच पावसामुळे रस्त्यांच्या कामाचे अन‌् संबंधित अधिकाऱ्यांचेही पितळ उघडे पडले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेश मंडळांसह नागरिकांकडून रस्ते दुरुस्तीची मागणी केली जात असून, खळखट्ट्याकचा इशारा दिला आहे. यामुळे या तक्रारींची दखल घेत आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी शनिवारी (दि.२०) खातेप्रमुखांच्या बैठकीत बांधकाम आणि गुणवत्ता नियंत्रण या दोन्ही विभागांतील अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. नागरिकांनी भरलेल्या करातून रस्ते तयार केले जातात, मग त्यांनी त्रास का सहन करायचा असा प्रश्न करत रस्त्यांच्या दुरुस्तीची तत्काळ कामे करून खड्डेमुक्त रस्ते देण्याचे निर्देश दिले आहेत.

दुरुस्तीवर पुन्हा २८ कोटी खर्च होणार : ठेकेदार आणि काही लोकप्रतिनिधी एकत्र येऊन रस्त्यांची कामे रिंग करून मिळवतात. निकृष्ट दर्जाचे रस्ते करायचे. रस्ते खराब झाले की दुरुस्तीसाठी पुन्हा कंत्राट घ्यायचे असा उद्योग महापालिकेत सर्रासपणे सुरू आहे. यामुळे अधिकाऱ्यांबरोबरच काही लोकप्रतिनिधींच्या पाठबळामुळे ठेकेदारांचे फावत आहे. शहरातील खड्डे बुजविण्यासाठी आताही सुमारे २८ कोटी खर्च करण्यात येणार असून, जनतेच्या खिशातील या पैशाचा आता तरी योग्य वापर होणार का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

नागरिक भरत असलेल्या कररूपी पैशांचा योग्य वापर झाला पाहिजे. रस्त्यांचे काम निकृष्ट करणाऱ्यांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश बांधकाम विभागाला दिले आहेत. नवीन रस्त्यांवरही खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. गुणवत्ता नियंत्रण विभागाला कारभार सुधारण्यास सांगितले आहे. – डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त, मनपा.

हेही वाचा:

The post नाशिक : रस्त्याचे निकृष्ट काम करणारे ठेकेदार ब्लॅकलिस्टमध्ये जाणार appeared first on पुढारी.