नाशिक : रस्त्याच्या निकृष्ट दर्जाविषयी सरपंचास तक्रार केल्याने वृद्धास मारहाण

लासलगाव(जि. नाशिक) वृत्तसेवा : निफाड तालुक्यातील गोंदेगाव येथे गावात सुरू असलेल्या रस्ता कामाच्या निकृष्ट दर्जाविषयी सरपंच अनिल रणशूर यांचेशी चर्चा करीत असतांना जेष्ठ नागरिकास मारहाण केल्याची घटना (दि. १०) घडली. पोपट गंगाधर भोसले (वय ७०) असे मारहाण झालेल्या वृद्धाचे नाव असून त्यांनी मारहाण करणाऱ्या निलेश उर्फ बाल्या भाऊसाहेब भोसले याच्या विरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

गोंदेगाव येथे गावांतर्गत रस्त्याचे काम सुरू असून खडी टाकलेली आहे. ही खडी दाबण्यासाठी त्यावर रोलर फिरवण्याऐवजी जेसीबी फिरवले जात होती. या कामाची पाहणी करण्यासाठी सरपंच अनिल रणशूर आले असता पोपट भोसले यांनी त्यांच्या लक्षात ही बाब आणून दिली. त्याचा राग आल्याने निलेश भोसले याने पोपट भोसले यांना शिवीगाळ केली. या कामासंदर्भात तुझा संबंध नसतांना तू बोलू नकोस असे पोपट भोसले यांनी म्हटल्यावर निलेश यांनी पोपट भोसले यांची गच्ची धरली, कपडे फाडत खाली पाडून हाताने आणि चापटीने मारहाण केली. या झटापटीत त्यांच्या हाताला इजा झाली आहे. त्यामुळे पोपट भोसले यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.याबाबत स.पो.नि. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : रस्त्याच्या निकृष्ट दर्जाविषयी सरपंचास तक्रार केल्याने वृद्धास मारहाण appeared first on पुढारी.