Site icon

नाशिक : राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन

नाशिकरोड:  पुढारी वृत्तसेवा
राज्यातील महत्वपूर्ण चार मोठे उद्योग प्रकल्प केवळ शिंदे-फडणवीस सरकारच्या आडमुठेपणा धोरणामुळे महाराष्ट्राबाहेर जात असल्याने नाशिक तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष गणेश गायधनी यांच्या नेतृत्वाखाली नाशिकचे उपजिल्हाधिकारी भिमराव दराडे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दिनेश धात्रक, अक्षय कहांडळ,जिल्हा सरचिटणीस गोरख ढोकणे, जिल्हा कोषाध्यक्ष अक्षय भोसले, संघटक संदीप जाधव उपस्थित होते.
उद्योगजगतात महाराष्ट्रातील वातावरण व इतर बाबींचा विचार करता प्रथमत: समृध्द अशा महाराष्ट्र राज्यालाच प्राधान्य दिले जाते. त्यामुळे या उद्योगधंद्यांमुळे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. परंतु सत्तेतील सरकारामुळे मुंबईसह महाराष्ट्राची ओळख पुसण्याचे काम होत आहे. त्यामुळे राज्यातील तरुण  बेरोजगारीच्या उंबरठ्यावर उभे आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील अनेक उद्योग, सरकारी कार्यलये आणि प्रस्तावित प्रकल्प आयत्यावेळेला गुजरातला हलवण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प, एअरबस-टाटा, सॅफ्रन प्रकल्प यासारख्या अब्जावधी रक्कमेच्या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात लाखो तरुणांना रोजगारनिर्मिती होणार होती. परंतु तसे न झाल्याने महाराष्ट्राची अधोगती होत आहे. येथील भाकरी खाऊन गुजरात राज्याची चाकरी करण्यापेक्षा महाराष्ट्र राज्याचा विकास करून तरुणांना रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. तसेच चुकीच्या धोरणामुळे रोजगार मिळून देणारे प्रकल्प राज्याबाहेर जाऊ न देता त्यांना महाराष्ट्रातच जागा उपलब्ध करून द्यावी. यापुढील काळात एकही प्रकल्प राज्याबाहेर गेल्यास या सरकार विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दिनेश धात्रक, अक्षय कहांडळ, जिल्हा सरचिटणीस गोरख ढोकणे, जिल्हा कोषाध्यक्ष अक्षय भोसले, संघटक संदीप जाधव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन appeared first on पुढारी.

Exit mobile version