
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नागपूरला झालेल्या दुसर्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलांच्या गटात नाशिकच्या कुशल चोपडा याने अंतिम फेरीत ठाण्याच्या स्वतिक अटनेकर याचा 4-2 सहज पराभव करून अजिंक्यपद पटकावले. या हंगामातील कुशलचे हे दुसरे विजेतेपद आहे. मुलींच्या गटात नाशिकच्या सायली वाणीने अंतिम फेरीत मुंबईच्या रिशा मीरचंदानीचा अटीतटीच्या लढतीत 4-3 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावले.
मुलांच्या गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी कुशलने उपांत्यपूर्व फेरीत मुंबईच्या देव हिंगोरानीचा अटीतटीच्या लढतीत 4-3 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या लढतीत मुंबईच्या शर्वय सामंत याच्याशी त्याची गाठ पडली. त्यात कुशलने त्याचा 4-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश करीत विजेतेपदावर आपले नाव कोरले. मुलींच्या गटाच्या अंतिम फेरीत पोहोचण्यापूर्वी सायलीने उपांत्यपूर्व फेरीत ठाण्याच्या प्रियंका गुप्ताचा 4-1 असा पराभव केला. उपांत्य फेरीत तिने मुंबईच्या अनन्या चांदेवर 4-0 असा विजय मिळवित अंतिम फेरीत प्रवेश करून विजेतेपद मिळविले. विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते चषक व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कुशल व सायली हे दोघेही जय मोडक यांच्या मार्गदर्शनखाली सराव करीत आहेत. जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सचिव शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, अभिषेक छाजेड, मिलिंद कचोळे, जय मोडक, संजय वसंत, यतीन टिपणीस, रामलू पारे, प्रकाश जसानी, विवेक आळवणी, श्रीकांत अंतूरकर यांनी यशस्वी खेळाडूंचे कौतुक केले.
हेही वाचा:
- नाशिक : सुपर 50 ची व्याप्ती वाढणार; अपर आयुक्तालयनिहाय 60 विद्यार्थ्यांची निवड होणार
- पिंपरी : पोलिस असल्याचे भासवून व्यावसायिकाचे अपहरण पाच लाखांची मागणी
- Nashik Malegaon : अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ‘नफरतो, भारत छोडो’ फेरी
The post नाशिक : राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत कुशल चोपडा, सायली वाणीला विजेतेपद appeared first on पुढारी.