Site icon

नाशिक : राहुल गांधी यांची शिवरायांशी तुलना अयोग्य, माफी मागा, व्हीडिओ डिलीट करा – भाजपा

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

काँग्रेसच्या एका व्हीडिओवर भाजपने आक्षेप घेतला आहे. तो व्हीडिओ डिलीट करावा, अशी मागणी भाजप पक्षाने केली आहे. तसेच काँग्रेसने जाहीर माफी मागावी, असेही भाजपने म्हटले आहे. यावेळी राहुल गांधी यांच्यावरही टीका करण्यात आली आहे.

येत्या सहा जून रोजी छत्रपती शिवरायांचा साडेतीनशेवा राज्यभिषेकदिनाची संपूर्ण महाराष्ट्रात तयारी सुरु असताना राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाकडून शिवरायांचा अपमान झालेला आहे. याचा निषेध म्हणून रविवार कारंजा येथे भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे राहुल गांधी यांना जोडे मारो आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनप्रसंगी भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष अमित घुगे, प्रदेश सचिव विजय बनछोडे, शहर सरचिटणीस निखीलेश गांगुर्डे, सागर शेलार, देवदत्त जोशी, वसंत उशीर, प्रतिक शुक्ल, राहुल कुलकर्णी, अनिल भालेराव, राकेश पाटील, महेश भांमरे, सुनिल वाघ, प्रविण भाटे, पवन उगले, ऋषिकेश शिरसाठ, हर्षद जाधव, विपुल सुराणा, विजय गायखे, विक्रांत गांगुर्डे, कुणाल निफाडकर, सनी गोसावी, अक्षय गांगुर्डे, विनोद येवलेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

नाशिक : शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याने राहुल गांधी यांना जोडे मारुन निषेध नोंदवताना भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते. (छाया: हेमंत घोरपडे)

काँग्रेसकडून राहुल गांधी यांचा एक व्हीडिओ सोशल मिडीयावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये भारत जोडो यात्रेसह कर्नाटक निवडणूक आणि इतर ठिकठिकाणाचे राहुल गांधी यांचे व्हीडिओ आणि फोटो यामध्ये आहेत. तसेच व्हिडीओला पार्श्वसंगीत लावण्यात आलेले आहे. या आक्षेपार्ह व्हिडीओला भाजपने आक्षेप घेतला आहे. एक-एक करून सगळे गड जिंकायचेत. सगळ्या दुश्मनांशी लढून प्रत्येक मैदान जिंकायचे आहे, असं कॅप्शनही या व्हीडिओला देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना राहुल गांधी बरोबर करणे योग्य नाही. त्यामुळे लवकरात लवकर काँग्रेस पक्षाने हा व्हीडिओ सर्व माध्यमांवरून डिलीट केला पाहिजे. तसेच माफी मागीतली पाहिजे. जर हा व्हीडिओ डिलीट केला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनं करू, असा भाजप पक्षाकडून यावेळी इशारा देण्यात आला आहे.

काँग्रेसकडून प्रसिध्द झालेला काय आहे व्हीडीओ पहा…

The post नाशिक : राहुल गांधी यांची शिवरायांशी तुलना अयोग्य, माफी मागा, व्हीडिओ डिलीट करा - भाजपा appeared first on पुढारी.

Exit mobile version