नाशिक : पुढारी वृत्तसेवा
यंदाच्या गटारीवर महागाईचे सावट असून मद्याच्या दरात २० टक्के, तर मटण, चिकनच्या दरात तब्बल ३० टक्के वाढ झाली असली, तरी महागईची ऎसी तैसी करत तळीरामांनी रविवारी जोरदार गटारी साजरी केली. शहर आणि परिसरात रिमझिम पावसाने तळीराम खुष आहेत. शहरालगतचे धरण परिसर दिवसभर तरुणाईच्या गर्दीने फुलून गेले होते.
बहुतांश कुटुंबांत श्रावण शुद्ध प्रतिपदेपासून गणेश चतुर्थीपर्यंत मांसमटणाला स्पर्श केला जात नाही. त्यामुळे गटारीच्या दिवशी मच्छी, मटण व चिकनवर ताव मारला जातो. मंगळवारपासून श्रावण महिना सुरू होत असला तरी सोमवार व मंगळवारी मांसाहार केला जात नसल्याने शनिवार आणि रविवारीच गटारी सेलिब्रेशनचा रंग चढलेला सर्वत्र दिसून आला. यंदा अधिक श्रावण असल्याने आणि तो पाळण्याकडे बहुतांश जणांचा कल असल्याने यंदाची गटारी रविवारीच धुमधडाक्यात साजरी झाली.
गंगापूर रोड, इंदिरानगर, सिडको, नाशिक रोड, पंचवटीत आज दिवसभर मटण, मच्छी विक्रेत्यांनी तुफान विक्री केली. दिंडोरी, पेठ, ओझर, औरंगाबाद आणि सिन्नर रोडवरील धाबे सकाळपासून हाऊसफुल्ल होते. शहरातील सर्वच बार, हॉटेल व् धाब्यांवर गटारीची जोरदार धूम शनिवारपासून सुरु झाल्याने धाबेमालक खुष आहेत.
यंदा गटारीवर महागईचे सावट आहे. मागील वर्षीच्या तुलनेत देशी विदेशी मद्याच्या किमतीत २० टक्के वाढ करण्यात आली आहे. तर चिकन व् मटनच्या दरात देखील 2५ ते ३० टक्के वाढ करण्यात आली आहे. यंदा शनिवार, रविवार व सोमवार या तीन दिवसात तब्बल १५ लाख लीटर बियर, १० लाख लीटर विदेशी मद्य एका आठवड्यात विक्री होण्याची शक्यता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे. मागील वर्षी गटारीच्या आठवड्यात १० लाख लीटर बियर, 8 लाख लीटर विदेशी मद्याची विक्री झाली होती.
मटन, चिकनच्या मागणीत वाढ
गटारीसाठी शहरातील चिकन, मटण व्यापाऱ्यांनी जय्यत तयारी केली असून, तब्बल १० टन चिकन, 5 टन मटण आणि एक टनभर माशांची विक्री शनिवार व रविवार या दोन दिवसात झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला. गेल्या महिन्यापासून मांसविक्रीत फारशी तेजी नव्हती. मात्र, गटारीच्या दिवशी मासे, मटण व चिकनची मागणी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. चिकनबरोबरच मटणाचा चाहतावर्गही मोठा आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी मागील आठवड्यापासूनच बोकड खरेदी करून ठेवले होते. रविवारी एकाच दिवशी ४ टनांपर्यंत मटणविक्री झाल्याचा अंदाज आहे.
तळीरामानवर पोलिसांची करडी नजर
गटारीच्या पार्श्वभूमीवर दारु पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर रात्री पोलिसांची करडी नजर राहणार आहे. शहरातील प्रमुख चौकात श्वासविश्लेषक यंत्राद्वारे पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत. शहरांमधील विविध नाक्यानाक्यांवर वाहतूक पोलिसांचे पथक श्वास विश्लेषक यंत्राद्वारे मद्यपी चालकांची तपासणी करीत आहेत. अपघात टाळण्यासाठी पेठ, दिंडोरी आणि नाशिकरोड वाहतूक पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले असून या पथकाकडून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. तसेच गटारीच्या रात्री मद्यपार्टीनंतर होणारे वाहन अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी मद्यविक्री करणाऱ्या बारमालकांना वेळा पाळण्याबाबत तंबी दिलेली आहे.
हेही वाचा :
- आयटीआयच्या विद्यार्थ्यांना परदेशात डिमांड !
- पाठ्यपुस्तकांचा अनुवाद आवश्यक ! मातृभाषेतून शिक्षणाबाबत ‘यूजीसी’कडून मार्गदर्शक सूचना जारी
- यवतमाळ : भावाला थापड मारणाऱ्या युवकाचा भरचौकात खून
The post नाशिक : रिमझिम पावसात तळीरामांची गटारी 'सैराट' appeared first on पुढारी.