
नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा
उपजिल्हा रुग्णालयातील १०२ व १०८ रुग्णवाहिकांना टायरच नसल्याने रुग्ण व नातेवाईकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील रुग्णालयाची गती मंदावली असून रुग्णवाहिकांना “कोणी टायर देतं का, टायर” अशी आर्त हाक देण्याची वेळ आली आहे. खुद्द केंद्रीय आरोग्य-कुटुंब कल्याण राज्यमंत्री यांच्या तालुक्यातील रुग्णालयाची दुरावस्था झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
कळवण तालुक्यात माजी मंत्री स्व. ए. टी. पवार यांनी पाणी, शिक्षण, आरोग्य, रस्ते, धरणे असा चौफेर विकास केला आहे. यामध्ये कळवण येथे १०० खतांचे उपजिल्हा रुग्णालय तर अभोणा येथे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामुळे आदिवासी बांधवांच्या आरोग्याची मोठी सोय झाली आहे. मात्र स्थानिक प्रश्नाच्या हलगर्जीपणा व वरिष्ठ कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे कळवण शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका (एमएच ४१ ए ८०) व (एमएच ४१ एयू ३९१८) या वाहनांचे टायर नादुरुस्त झाल्याने रुग्णालयाच्या पाठीमागील भागात धूळीच्या साम्राज्यात अडकल्या आहेत. रुग्णवाहिकाच रुग्णशय्येवर असल्याने त्या वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्णवाहिकांना तत्काळ टायर उपलब्ध करून देण्याची मागणी रहिवाशांसह रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.
आरोग्यमंत्र्याच्या मतदार संघातच रुग्णालयाची वानवा…
कळवण हा आदिवासी बहुल तालुका केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या दिंडोरी लोकसभा मतदार संघात आहे. असे असताना त्यांच्या तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिकाची अशी दुरावस्था पहावयास मिळत असून रुग्णालयाची वानवा आहे. त्यामळे इतर आदिवासी दुर्गम भागातील अवस्था काय असावी असे चित्र स्पष्ट होते. आरोग्य मंत्र्यांच्या आढावा बैठकीत तक्रारी दाखल होऊनही बदल होत नसल्याने आदिवासी हतबल झाले आहेत. त्यामुळे तक्रार तरी कोणाकडे करावी. असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित…
कळवण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आठवड्यातून एक दोन दिवस कार्यरत राहून इतर दिवस अनुपस्थित असतात. त्यामुळे अपघात, प्रसूती असे रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून नाशिकला रवाना केले जात आहे. शिवाय रुग्णवाहिकेला टायरच नसल्याने नाशिकला जायचे कसे हा प्रश्न निरुत्तरीत होतो. उपजिल्हा रुग्णालयात येणार रुग्णाची हलाखीची आर्थिक परिस्थिती असल्याने त्यांना खाजगी वाहनांचा खर्च परवडणारा नाही.रुग्णालयाचे अधीक्षकांसह जिल्हा शल्यचिकित्सकांचे दुर्लक्ष होत आहे. येथील रुग्णवाहिकांची दुरुस्ती होणे गरजेचे झाले आहे.
हेही वाचा:
- IND VS BAN 1st Test : बांगलादेशी फिरकीपटूसमोर विराटची उडाली भांबेरी! काही कळायच्या आत… (VIDEO)
- ते मनमोहन सिंग व्हायचं स्वप्न पाहतायेत: भाजपची राजन यांच्यावर टीका
- बारामती: सोनगावला निरा नदीकाठी अवैध उत्खनन, अवजड वाहनांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका
The post नाशिक : रुग्णवाहिकांना टायरच नसल्याने रुग्णालयाची गती मंदावली; खुद्द केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या तालुक्यातील प्रकार appeared first on पुढारी.