नाशिक : रॉयल बेकर्सवर एफडीएचा छापा, आरोग्यास घातक खाद्यतेल जप्त

 नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा
एकदा वापरून झालेल्या खाद्यतेलाचा वारंवार वापर करून नागरिकांच्या आरोग्यास खेळणारे व्यावसायिक अन्न-औषध प्रशासन विभागाच्या रडारवर आले आहेत. आनंदवली परिसरातील रॉयल बेकर्स आस्थापनेवर अन्न-औषध प्रशासन विभागाने छापा टाकून आरोग्यास अपायकारक खाद्यतेल जप्त केले. टीपीसी यंत्राद्वारे या तेलाची तपासणी केली असता त्याचे रीडिंग 39.5 आले असून, अन्न-औषध प्रशासनाच्या निकषांनुसार ते हानिकारक आहे.

अन्न-औषध प्रशासन विभागाने शहरातील विविध हॉटेल्स व खाद्यपदार्थ तयार करून त्यांची विक्री करणार्‍या व्यावसायिकांच्या खाद्यतेलांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी शहरात प्रथमच टोटल पोलर काउन्ट यंत्राद्वारे हॉटेलमधील खाद्यतेलातील टोटल पोलर कंपाउंडचे रीडिंग घेण्याची मोहीम सुरू झाली. कारवाईच्या पहिल्याच टप्प्यात रॉयल बेकर्समधील खाद्यतेलाचे 39.5 रीडिंग आले. ते मुळात 25 पेक्षा कमी पाहिजे. अन्न प्रशासन नाशिक विभागाचे सहआयुक्त गणेश परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त विवेक पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे, अमित रासकर, योगेश देशमुख, प्रमोद पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

जप्त तेल खाण्यास अयोग्य
खाद्यतेलाचे टीपीसी (टोटल पोलर कंपाउंड) रीडिंग 25 च्या आत असल्यास ते तेल तळण्यासाठी योग्य असते. मात्र, त्यापेक्षा अधिक रीडिंग आल्यास ते तेल आरोग्यास धोकादायक असते. रॉयल बेकर्समध्ये तेलाचे रीडिंग 39.5 आले. हे तेल खाण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष अन्न व औषध अधिकार्‍यांनी काढत तपासणीसाठी पाठविले.

जास्तीत जास्त तीनदा वापर
खाद्यतेल तळणासाठी जास्तीत जास्त तीन वेळा वापरणे योग्य असते. परंतु बरेच हॉटेल व्यावसायिक सकाळी तळण्यास वापरलेले तेलच दिवसभर वापरतात. इतकेच नव्हे तर त्याच तेलात पुन्हा दुसरे नवे तेल मिसळतात.

जप्त खाद्यतेल ‘रुको’च्या ताब्यात
रॉयल बेकर्समध्ये वापरण्यात आलेले खाद्यतेल अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकार्‍यांनी बायोडिझेलच्या निर्मितीसाठी रुको या एजन्सीला देेणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : रॉयल बेकर्सवर एफडीएचा छापा, आरोग्यास घातक खाद्यतेल जप्त appeared first on पुढारी.